ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्याचा वीज पुरवठा खंडित
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सालवड येथील वाडीमध्ये खेळत असलेल्या लहान चिमुकल्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर महावितरण विरुद्ध प्रचंड जनक्षोभ पसरला असून, ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांनी महावितरण विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर कर्जत तालुक्याचा वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ महावितरणवर आली. शनिवारी (दि.23) दुपारी कर्जत तालुक्यामध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली.
नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावामध्ये महावितरणची मुख्य वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यातील एक वीज वाहिनी शिव रूपेश भोसले या लहानग्याच्या अंगावर पडून त्या बालकाचा मृत्यू झाला. शिव रुपेश भोसले हा दुपारी रस्त्याने जात असताना मेन लाईन अंगावर पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर तातडीने चिमुकल्या बाळाला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात नेण्याआधी त्या बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेने संपूर्ण सालवड गावावरती शोककळा पसरली असून, भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बालकांचे आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी महावितरणचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे नवीन काम करण्यात आलेल्या मेन लाईनच्या तारा नवीन बसवण्यात आल्या होत्या. त्या तुटल्यास कशा असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे? या नवीन काम करण्यात आलेल्या महावितरणच्या कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. याचाच निषेध करण्यासाठी मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय कळंबोली येथे मृतदेह घेऊन पोहोचले. तसेच न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह तेथून हलवला जाणार नाही. त्या ठेकेदारावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली.
कर्जत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप भोसले हे देखील तेथे पोहचले. मात्र, महावितरणचे अधिकारी चंद्रकांत केंद्रे यांनी या प्रकरणाची चौकशी करून मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर मृतदेह तेथून उचलून नेण्यात आला. दुसरीकडे ग्रामस्थ आणि स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण कंपनीला कर्जत तालुक्याची वीज खंडित करण्याची वेळ आली.
कर्जत वीज संघर्ष समिती आक्रमक
सालवड येथील शिव रुपेश भोसले या 9 वर्षाच्या मुलाला शॉक लागुन दुर्देवी घटना घडली. या घटनेस असिस्टंट इंजिनिअर सिंग हे सर्वस्वी जबाबदार आहेत. ही मेन लाईन दोन दिवसांपुर्वी दुरुस्त केली होती. हे काम व्यवस्थित करून घेणे हि सर्वस्वी जबाबदारी सिंग यांची होती. त्यामुळे त्यांच्या निषकाळजीपणामुळे हि घटना घडली. त्यामुळे सिंग यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करावे. तसेच तालुक्यातील सर्व जुन्या वायरींचे त्वरीत सर्व्हे करून त्या लवकरात लवकर बदलण्यात याव्यात. याशिवाय सोमवारी याबाबत मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचेही समितीच्यावतीने सांगण्यात आले.







