एसटी बस पकडताना वयोवृद्ध महिला घसरुन पडली

। कोलाड । वार्ताहर ।

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर ऐन पावसाळ्यात प्रवाशी वर्गाला आता एसटी बस पकडणे अवघड झाले आहे. बस पकडण्यासाठी प्रवाशांची तारेवरची कसरत होत आहे, तर पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने बस आली रे आली की एकच धावाधाव आणि पळापळ सुरु होते. मात्र या सार्‍या भानगडीत गुरुवारी 20 जून रोजी पहाटे प्रवास करणारी एक वयोवृद्ध महीला भर पावसात पाय घसरून पडली. या महिलेचे दैव बलवत्तर म्हणून तिला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही, तर त्या महिलेला तिचे नातलग आणि काही प्रवाशी वर्गानी उचलून तिला धीर दिला. या घटनेमुळेे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून प्रवाशांचा जीव गेल्यावर या ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या जातील का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई महामार्गावर असलेला कोकणातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे कोलाड आंबेवाडी नाका. हा नाका सर्वांनाच सुपरिचित असल्याने या ठिकाणाहून प्रवाशी वर्गाला सर्व ठिकाणी प्रवास करण्यास सोईस्कर होत असल्याने अनेक प्रवाशी या ठिकाणी असतात. याच नाक्यावरून आता प्रवास करणार्‍या प्रवाशी वर्गाला एस टी बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तर वाहतूक कोंडीमुळे प्रवास धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल कोण बघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करणाचे काम गेली तेरा चौदा वर्षे सुरु आहे, तर येथील कोलाड आंबेवाडी नाका येथे ऐन पावसाळ्यात उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अरुंद आहेत. पावसामुळे खड्ड्या पाणी साचून राहते. पूर्वी बनविलेल्या प्रवासी निवारा शेड या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई, रोहा, मुरुड, सुतारवाडी, भिरा, पुणे, तसेच इंदापूर, माणगाव, महाडसह तळ कोकणात तसेच महाबळेश्‍वर वाई, सातारा, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर प्रवास करणार्‍या प्रवाशांना तसेच विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात चांगलीच गैरसोय होत आहे. लवकर उपाय योजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version