| पाताळगंगा | प्रतिनिधी |
चौक बाजार पेठेतील एमएसईबीची असलेली विद्युत वाहक केबल तुटल्यामुळे नागरिकांच्यामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हा धोका गंभीर असतो. मात्र, या ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांच्या सतर्कमुळे होणारा अपघात टळला आहे. त्यांनी तातडीने वीज पुरवठा कार्यालयाला संपर्क करुन वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.
नुकतेच चौक येथील विजेचा लपंडाव सुरु असून, भिंगारी तसेच चौक येथील कार्यालयात जाऊन समस्यांचा पाढा वाचण्यात आला. मात्र, त्यावर कोणतीही उपाय योजना झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी विद्युत वाहक केबल जीर्ण झाल्यामुळे त्या तुटून जमिनीवर पडण्याच्या घटना सतत घडत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, चौक ही जुनी बाजार पेठ असल्यामुळे या ठिकाणी शेकडोहून अधिक जण येत असतात. त्यातच येथे असलेले जय हिंद स्टोअरच्या समोर ही विद्युत वाहीनी तुटली असल्यामुळे काही काळ नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.







