पेझारीच्या श्रीपंत भक्त मंडळाशी भावनिक नाते; आ. जयंत पाटील यांच्याकडून आठवणींना उजाळा

| पेझारी | वार्ताहर |

पेझारी येथील गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानने अध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे स्व. प्रभाकर पाटील यांच्या कुटुंबासमवेत एक वैयक्तिक नाते तयार झाले असल्याचे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी रविवारी पेझारी येथे केले. पेझारीतील गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानच्या वतीने स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त रविवारी रौप्य महोत्सवी महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ.पंडित पाटील, माजी जि.प. सदस्या भावना पाटील, पेझारी उपसरपंच मनोज धुमाळ, मॉर्निंग वाचक ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, सुनील राऊत गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख दिगंबर राणे, जिल्हा सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी व पंतभक्त गुरूबंधू-भगिनी, ग्रामस्थ आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायक असून सातत्याने 25 वर्ष या शिबिराचे ते आयोजन करतात. या श्रीदत्त मंदिरात आणि गुरूवर्य सुभानराव राणे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पाटील कुटुंबीय प्रत्येक वेळी येतो. हे आमचे श्रध्दास्थान आहे.

आ. जयंत पाटील

या प्रतिष्ठानच्या कार्याचा समाजातील प्रत्येकाने आदर्श घेऊन कार्य करावे तसेच या प्रतिष्ठानने स्वतः ची रक्तपेढी तयार करावी अशी सूचना जयंत पाटील यांनी केली. या वेळी त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या रक्तदान शिबिरासाठी झेप फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. चित्रा पाटील यांनी उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठानला 21 हजार रूपयांची देणगी दिली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सूत्रसंचालन शैलेंद्र भगत, दीनानाथ कडू यांनी केले. या रक्तदान शिबिरासाठी खालापूर तालुक्यातील गोहे येथील गुरूबंधूंची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी श्रीपंत महाराजांच्या आरती अवधूताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version