प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, आजही रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यातून स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.
मागील आठ दिवसापूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शासकीय यंत्रणेसह वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागाची साफसफाई केली. समुद्रकिनाऱ्यांसह रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत काढून त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली. मात्र, आजही ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे. अलिबाग-रोहा मार्गाबरोबरच अलिबाग-मुरुड, अलिबाग-पेण मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग पडले आहेत. प्लास्टिकसह कागद व अन्य टाकाऊ वस्तू या परिसरात पडलेल्या आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
प्लास्टिक संकलन केंद्र गावांमधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कंपोस्ट पीट व प्लास्टिक संकलन केंद्र उभारणीला प्राधान्य दिले आहे. ग्रामपंचायत स्तरावर ठिकठिकाणी ही कामे करण्यात आली आहेत. घरच्या घरी ओला कचरा वर्गीकरण केले पाहिजे. कंपोस्ट खत खड्डयांना प्राधान्य दिले पाहिजे. तरच गावांतील कचऱ्याचा प्रश्नमार्गी लागेल अशी माहिती जिल्हा परिषद स्वच्छता मिशनमधून देण्यात आली.