| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाने तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. त्या माध्यमातून शेकापकडून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय येथे हा रोजगार मेळावा होणार असून इयत्ता आठवी पास ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी हा मेळावा असणार आहे.
कर्जत शेतकरी कामगार पक्षाने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीकडून तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या माध्यमातून तरुणांमध्ये शेकापच्या लढावू वृत्तीबद्दल आणि शेतकरी, रोजगार विषयक चळवळीबद्दल ठोस भूमिका घेण्याचा प्रयत्न शेकापचे तालुका चिटणीस मंडळ करणार आहेत. शेकाप कर्जत तालुक्याचे चिटणीस तथा आरडीसीसीचे संचालक तानाजी मते, पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, जिल्हा खजिनदार श्रीराम राणे यांनी कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे वतीने प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयात आयुक्त करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात किमान 500 तरुणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ब्लिंकिट आणि गोदरेज सारख्या कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून शेकापकडून तरुणांना 100 टक्के रोजगाराची हमी देण्यात आली आहे.





