सार्वजनिक उद्यानात उभारले बंदिस्त खेळाचे मैदान

शेकापची कारवाईची मागणी

| नवीन पनवेल | वार्ताहर |

खारघर, सेक्टर 19 मधील सार्वजनिक उद्यानात बंदिस्त खेळाचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानात विशिष्ट शुल्क आकारून ही जागा खेळाडूंना खेळण्यास देण्यात येत आहे. या मैदानाचे भाडे येथील स्थानिक नगरसेवक घेत असल्याचा आरोप शेकापच्या रायगड जिल्हा सहचिटणीस तेजस्वी जगदीश घरत यांनी केला आहे. यावर कारवाई करण्यासाठीचे निवेदन त्यांनी पनवेल पालिका आयुक्तांना दिले आहे.

उद्यानातील या मैदानात फुटबॉल, बॅडमिंटन, हॉलीबॉल, स्केटिंग खेळण्यात येत आहे. तसेच या मैदानाच्या आतील आणि बाहेरील बाजूस राजकीय व अकॅडमीचे अनधिकृतरित्या पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. खेळाच्या नावाने या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप तेजस्वी घरत यांनी केला आहे. या उद्यानाची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. गेट देखील तुटलेल्या अवस्थेत आहे तर अनेक ठिकाणी झाडांच्या सुकलेल्या फांद्या पडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी गवत उगवलेले आहे. सार्वजनिक उद्यानात बंदिस्त खेळाचे मैदान कोणी उभारले याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी घरत यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version