चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण बैठक

| चिरनेर | वार्ताहर |

गावाला दरवर्षी बसणाऱ्या पूर सदृश्य परिस्थितीच्या गंभीर समस्येचा प्रश्न आणि भोम ते अक्कादेवीच्या युद्धभूमीकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या दुरावस्थेचा प्रश्न हे येथील नागरिकांच्या दोन गंभीर समस्या आहेत. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केवळ निषेध म्हणून यंदाचा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृतिदिन अभिवादन सोहळा सरकारी नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी याबाबत चर्चा करण्यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीचे प्रशासक मिंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीसपाटील संजय पाटील, शेकापचे सुरेश पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, माजी सरपंच संतोष चिरलेकर, निवृत्त अधिकारी श्रीधर मोकल, सामाजिक कार्यकर्ते जयेश खारपाटील तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

इतिहासातील शौर्याची साक्ष देणारे चिरनेर हे उरण तालुक्यातील ऐतिहासिक गाव मात्र चिरनेर गावातील मुख्य आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था आणि चिरनेर गावाला जोडणाऱ्या भोम ते अक्कादेवी या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या रणसंग्रामाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. या रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे रहिवाशी आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून नियमित येणारे जाणारे नागरिक, भक्तगण, पर्यटक, शाळेचे विद्यार्थी, वाहन चालक, शेतकरी, रुग्ण आदींचे हाल होत आहेत. या मार्गावरून प्रवास करणे फार जिकरीचे झाले आहे. चिरनेर गावात श्री महागणपतीचे प्रसिद्ध मंदिर आणि जंगल सत्याग्रहाचा इतिहास जपणारा हुतात्मा स्मारक, बँका, आरोग्य केंद्र शाळा, महाविद्यालय आणि अन्य सेवा सुविधा असल्याने शासकीय व निमशासकीय काम करण्यासाठी नागरिकांना चिरनेर गावात याच मार्गावरून यावे लागत आहे. पण चिरनेर गावातील रस्त्यांची दुरावस्था बघून लोक नाके मुरडतात. येथील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्नही मार्गी लागत नसल्यामुळे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंदाचा 25 सप्टेंबर रोजी साजरा होणारा हुतात्मा स्मृतिदिन अभिवादन सोहळा निषेध म्हणून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे. अभिवादन सोहळ्यात पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात येईल. हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार सोहळा त्यांच्या घरी जाऊन करण्यात येईल. हुतात्मा स्मारक परिसराची रंगरंगोटी, डागडुजी करण्यात येणार असल्याची चर्चाही बैठकीत करण्यात आली.

Exit mobile version