प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणाच्या पवित्र्यात

| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याबाबत प्रशासनाची कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. त्यामुळे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या 11 डिसेंबरपासून रिलायन्स कंपनीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भिमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्षमय लढा दिला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांनी दिली.रोहा तालुक्यातील नागोठणे या ठिकाणी रिलायन्स प्रकल्प उभा आहे.

या प्रकल्पासाठी झोतिरपाडा, बेणसे, आंबेघर, वेलशेत, कडसुरे, कुहिरे, शिहू वरवठणे या गावांतील दोन हजार 200 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. एक हजार 237 प्रकल्पग्रस्त आहे. यापैकी 690 प्रकल्पग्रस्तांना कंपनीत नोकरी देण्यात आली आहे. मात्र उर्वरित प्रकल्पग्रस्त आजही नोकरीपासून वंचित आहेत. शेतकरी भूमीहिन झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

नोकरी मिळावी यासाठी अनेक वेळा मोर्चे काढले, निवेदन देण्यात आले. अखेर उद्योग विभागातील विकास आयुक्त दिपेंद्र कुशवाह यांच्यासमवेत 20 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना टप्प्या टप्प्याने नोकरीत घेण्याबाबत सूचना देण्यात आली. सुरुवातीला 324 प्रकल्पग्रस्तांना तात्काळ कंपनीत नोकरी मिळावी असे नमुद करण्यात आले. मात्र अद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. न्यायास विलंब होत असल्याने सोमवारी 11 डिसेंबर रोजी बेमुदत उपोषण केले जाणार असल्याची माहिती गंगाराम मिनमिने यांनी दिली.

याविषयी अधिक माहितीसाठी कंपनी व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, शासनाने याबाबत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे कंपनी व्यवस्थापनाने पालन केलेले आहे. त्यामुळे याविषयी कोणतेही बंधन कंपनी व्यवस्थापनाकडे शिल्लक नाही. सदरहू संघटनेने सुरू केलेले आंदोलन हे बेकायदेशीर आहे.

रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याबाबतची चर्चा मंत्रालयात आयुक्त कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये 324 प्रकल्पग्रस्तांना घेण्याबाबत नमुद करण्यात आले. मात्र जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकारची सूचना केली नाही.

सुनील थोरवे, अपर जिल्हाधिकारी , रायगड
Exit mobile version