। मुंबई । वृत्तसंस्था ।
उमेदवारी अर्जावर अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने चेंबूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्यांनी रद्द केला आहे. याप्रकरणी अपक्ष उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. आता या अपक्ष उमेदवाराने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिष गडकरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून चेंबूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्याने निवडणूक अधिकार्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. निवडणूक अधिकार्यांनी पडताळणी न करताच आपला उमेदवारी अर्ज स्वीकारला होता. त्यांनी आपल्याला वेळच दिला नाही. हा अन्याय असून निवडणूक लढवण्यासाठी मला पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे, असा आरोप त्यांनी केला.