शोध जिजाऊ, सावित्रीच्या लेकींचा
। वावोशी । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सत्यशोधक वारकरी महासंघाच्यावतीने ‘शोध जिजाऊ-सावित्रीच्या लेकींचा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिलांना जिजाऊ माँ साहेब आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी जोडणे आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उत्सवात ‘गरबा नृत्य’ झाल्यानंतर महिलांसाठी एक विशेष प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नमंजुषेत सावित्रीमाई फुले व जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण दिला गेला व यातून सहभागी महिलांपैकी प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाची विजेती निवडण्यात आली. विजेत्या महिलांचा पैठणी, साडी आणि इतर उपहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या उपक्रमात विजेत्या महिलांचे कौतुक देखील करण्यात आले. या उपक्रमात प्रथम क्रमांक मिळालेल्या नीलम गोळे यांना पैठणी साडी, द्वितीय क्रमांक निकीता भगत यांना साडी व तृतीय क्रमांक किशोरी पोंगडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिवाय सर्व सहभागी महिलांना उत्तेजनार्थ भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यशोधक वारकरी महासंघ आणि विनायक अपार्मेंटमधील सर्व सभासदांनी मोलाचे योगदान दिले. या उपक्रमात कृष्णा ठाकूर, निखिल भगत, निशा येलवे, रूक्मिणी सावंत, माला सिंग, निशा हुले, अनिता गिरी, शिला चव्हाण, अनिता ठाकूर, श्रीकृष्ण ठाकूर, चंद्रकांत येलवे, विश्वास कदम, लक्ष्मण चव्हाण, नितेश भगत, अविनाश झोरे, माधव सानप आदी सदस्यांचे सहकार्य लाभले.
उपक्रमाचा मुख्य हेतू महिलांना सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणे तसेच त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यास प्रवृत्त करणे हा होता. महिलांच्या जीवनात शिक्षण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली.
– महेश पोंगडे महाराज, सत्यशोधक वारकरी महासंघ