। पालघर । प्रतिनिधी ।
डहाणू-कासा राज्य मार्गावर मोकाट जनावरांमुळे होणार्या अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी डहाणू येथील वन्यप्राणी प्रेमी आणि गोप्रेमी स्वप्निल खताळ यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हे पट्टे लांबून दिसल्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे.
स्वप्निल खताळ यांनी एकदा स्वतः मोकाट गुरांच्या अपघाताचा प्रसंग पाहिल्याने, त्यांनी अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी डहाणू-कासा राज्य मार्गावरील मोकाट जनावरांसाठी विशेष रेडियम पट्टे तयार केले आहेत. रात्रीच्या अंधारात या पट्ट्यांमुळे गुरांना वाहनचालकांद्वारे सहज ओळखता येईल, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. या मोहिमेचा एक भाग म्हणून डहाणू सागर नाका, राई, कंक्राटी, सावटा, चिखले इत्यादी भागांमध्ये मोकाट गुरांच्या गळ्यात रेडियम पट्टे बांधले गेले आहेत. यासाठी सध्या 500 रेडियम बेल्ट तयार करण्यात आले आहेत, आणि या मोहिमेला स्थानिक पशू प्रेमी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.खताळ यांनी सांगितले की, मोकाट गुरांच्या गळ्यात पट्टे बांधताना अपघाताचा धोका असतो, त्यामुळे गुरांना काही खाऊ घालून त्यांना पट्टे बांधले जातात. ही मोहीम संध्याकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत राबवली जात आहे.