कवितेतून वाहतूक नियमांची शिकवण
| पनवेल | प्रतिनिधी |
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 चे औचित्य साधून पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने के.ए. बांठिया हायस्कूल, नवीन पनवेल तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, पळस्पे येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियम जनजागृतीचा अभिनव व प्रभावी कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत कवी मोहन काळे यांच्या माध्यमातून कविता व चारोळ्यांच्या सहाय्याने वाहतूक नियमांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यात आले. यावेळी शाळांना पुस्तक संचाचेही वितरण करण्यात आले.
रस्त्यांवरील वाढते अपघात, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि त्यातून होणारे जीवितहानीचे प्रकार रोखण्यासाठी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नाही, तर लहान वयातच सुजाण नागरिक घडवणे आवश्यक आहे, या हेतूने पनवेल शहर वाहतूक शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक भाषणांऐवजी प्रत्यक्ष संवादातून मार्गदर्शन करण्यात आले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने व तुकाराम कदम यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले.
तसेच पोलीस हवालदार युवराज येळे, अमीर मुलाणी, ज्ञानेश्वर पवार, महेंद्र गळवी, सागर यादव, प्रदीप चव्हाण व सुरेश यादव ,या अंमलदारांनी व आर एस पी शिक्षक डी जी पवार सर, म्हात्रे सर, महाजन सर यांनी शिस्तबद्ध व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कवी मोहन काळे यांनी आपल्या पुस्तकांतील कवितांच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कवितेच्या माध्यमातून दिलेला संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर विशेष ठसा उमटवणारा ठरला. या उपक्रमाला शाळा प्रशासनाचीही खंबीर साथ लाभली. के.ए. बांठिया हायस्कूलचे प्राचार्य बी.एस.माळी तसेच छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, पळस्पे येथील मुख्याध्यापक चिखलेकर यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, याबाबत सविस्तर व प्रेरणादायी माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप अत्यंत भावनिक व उत्साही वातावरणात झाला. पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी विद्यार्थ्यांना ‘वाहतूक सुरक्षा शपथ’ दिली. “वाहतूक नियम पाळणे हा पर्याय नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे,” हा ठळक संदेश यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.







