श्रावणी सोमवारी चौलच्या प्राचीन रामेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रायगडच्या ऐतिहासिक भूमीत वसलेली चौल नगरी ही केवळ प्राचीन बंदरनगरी म्हणूनच नव्हे, तर दक्षिण काशी म्हणूनही ओळखली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा येथे भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा उत्सव ठरतो. चौलचे ग्रामदैवत असलेल्या प्राचीन श्री रामेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारच्या निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
चौल ही हजारो वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली नगरी आहे. इतिहासात चंपावती, रेवतीक्षेत्र आणि चौल अशा विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या या भूमीचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. एकेकाळी देश-विदेशातील व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले हे बंदर आजही आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवामुळे भाविक व पर्यटकांना आकर्षित करत आहे. चौलमध्ये पूर्वी शेकडो मंदिरे आणि तळी असल्याच्या नोंदी आढळतात. त्यामुळेच या नगरीला मंदिरांची नगरी आणि दक्षिण काशी अशी ओळख प्राप्त झाली आहे.
या पवित्र भूमीतील श्री रामेश्वर मंदिर हे चौलचे ग्रामदैवत मानले जाते. मंदिराची भव्य वास्तू, समोरील विशाल पुष्करणी, दीपमाळ, नंदीमंडप आणि पारंपरिक कोकणी स्थापत्यशैली पाहताच भाविक भारावून जातात. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग विराजमान असून त्याबद्दल स्थानिकांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. मराठेशाहीच्या काळात नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे आणि विसाजीपंत सरसुभेदार यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विशेष योगदान दिल्याची ऐतिहासिक नोंद उपलब्ध आहे. श्रावण महिन्यात रामेश्वर मंदिरात भक्तीचा महासागर उसळतो. पहिल्या श्रावणी सोमवारपासून धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि विविध पूजाविधींना प्रारंभ होतो. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागतात. अनेक भाविक पायी चालत येऊन महादेवाचे दर्शन घेतात. मंदिर परिसरातील नारळी-पोफळींच्या बागा, शांत वातावरण आणि भक्तिमय स्वरांनी भरलेला परिसर भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतो.रामेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली अग्निकुंड, वायुकुंड आणि पर्जन्यकुंड ही प्राचीन धार्मिक स्थाने. दुष्काळी परिस्थितीत पर्जन्यकुंड उघडण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे.
