म्हसेवाडीत वृद्ध महिलेला लुटून केली हत्या

मारेकरी घटनेनंतर पसार;माणगाव पोलीस चक्रावले

| माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्यातील म्हसेवाडी येथील एका वृद्ध महिलेचे ती एकटीच घरात राहत असल्याचा फायदा घेत अज्ञात मारेकरी चोरट्यांनी तिच्या कानातील, गळ्यातील व अंगावरील सोन्याचे दागिने लुटून तिची घरातील पाण्याच्या टपात तोंड बुडवून हत्या करून पसार झाल्याची घटना मंगळवारी (दि.21) दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती माणगाव पोलिसांना कळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे आपल्या सहकार्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, हेड कॉन्स्टेबल लालासाहेब तोरणे, हेड कॉन्स्टेबल तुणतुणे,
पोलीस नाईक खिरिट, पोलीस पाटील प्रदीप म्हामुनकर तातडीने घटनास्थळी पोहचले.

या घटनेची सविस्तर हकिकत अशी की, संगीता श्रीरंग सावंत वय ६९ वर्ष राहणार म्हसेवाडी तालुका माणगाव या घटने वेळी आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. मुंबई येथे त्यांची मुले व नातलग असल्याने त्या मुंबई व म्हसेवाडी येथे अधून मधून राहत होत्या. मुंबई येथून त्या महाशिवरात्रीसाठी आपल्या म्हसेवाडी येथील घरी राहण्यासाठी आल्या होत्या. संगीता सावंत या महिलेचे घर म्हसेवाडी गावातील शेवटचे घर असून तेथून पुढे जंगल भाग आहे. त्या मंगळवारी (दि.21) दुपारी अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकट्या असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटे मारेकर्‍यांने त्या महिलेला लुटून त्यांची पाण्याच्या टपात बुडवून हत्या केली. काही वेळानंतर शेजारील लोक आजीचा आवाज येत नाही असे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ माणगाव पोलिसांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास माणगाव पोलिस करीत आहेत.

Exit mobile version