पारदर्शक परीक्षेसाठी एआय वापरणारे मुक्त विद्यापीठ ठरले राज्यातील पहिले

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीतील उन्हाळी परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून स्वागत

| नाशिक | प्रतिनिधी |

पारदर्शक परीक्षेसाठी एआय सीसीटीव्ही कॅमेरे वापरणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. त्यामुळे मुक्त शिक्षण प्रणाली, ब्लॉकचेन, क्युआर कोड अशा अद्ययावत व विविध तंत्रस्नेही वापरात प्रथम आघाडीवर असणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या या धाडसी पावलाचे विद्यार्थी वर्गाकडून देखील स्वागत करण्यात आले आहे. ‘आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत परीक्षा देऊन गुणवत्ता प्राप्त केली आहे असे सर्वांना अभिमानाने सांगू’ अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

बुधवार दिनांक 27 मे 2026 पासून मुक्त विद्यापीठाच्या मे / जून 2026 च्या मुख्य (उन्हाळी) परीक्षेस सुरुवात झाली आहे. त्यासाठी ए.आय. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सीसीटीव्ही देखरेख प्रणाली या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर अवलंब करण्यात येत आहे. विद्यापीठाची परीक्षा पारदर्शक, सुरक्षित व गैरप्रकारमुक्त वातावरणात संपन्न व्हावी यासाठी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून हे अद्ययावत पाउल उचलण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील एकूण 558 परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका डाऊनलोडिंग कक्ष व उत्तरपत्रिका सिलिंग कक्ष येथे ए.आय. प्रणाली आधारित सीसीटीव्ही कॅमेरे अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत बसविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात त्यापैकी काही निवडक अशा एकूण 84 परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक परीक्षा वर्गखोल्यात ए.आय. प्रणाली आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यापीठाच्या मुंबई, नागपूर, नांदेड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे व नाशिक या आठ ही विभागीय केंद्रांवरून त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित परीक्षा केंद्रांवरील परीक्षेचे नियंत्रण करण्यात येत आहे.

नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात त्यासाठी एक स्वतंत्र मुख्य नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. येथून सर्व परीक्षा केंद्रांवर 20 एलईडी स्क्रीन व एक एआय अलर्ट स्क्रीन अशा 21स्क्रीनद्वारे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित परीक्षा केंद्र आणि प्रत्यक्ष परीक्षा वर्गातील संशयास्पद हालचाली अथवा गैरप्रकारांबाबतच्या हालचाली त्वरित विद्यापीठ मुख्यालय तसेच संबंधित विभागीय केंद्रांच्या नजरेत कैद होऊ शकतात. तसेच या परीक्षा केंद्रांवरील परीक्षेच्या कालावधीतील सीसीटीव्ही छायाचित्रण देखील उपलब्ध असणार आहे. ही एआय प्रणाली तीन मुख्य सुत्रांद्वारे कार्यरत आहे. प्रथम म्हणजे या प्रणालीत संबंधित वर्गखोल्यातील विद्यार्थी व पर्यवेक्षक यांची संख्या व हालचाल प्रमाणित करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त अधिकची संख्या किंवा संशयास्पद हालचाल दिसल्यास हा एआय कॅमेरा त्याच सेकंदास विभागीय केंद्र व नाशिक मुख्यालयास सूचित करतो. दुसरे म्हणजे या एआय कॅमेरासोबत कोणी छेडछाड करण्याचा (कापड टाकणे, दिशा बदलवणे वा इतर) प्रयत्न केल्यास त्याची देखील सूचना नियंत्रण कक्षास त्वरित प्राप्त होते. तिसरे म्हणजे परीक्षा केंद्रावरील प्रश्नपत्रिका डाऊनलोड व उत्तरपत्रिका जमा (सिलिंग) कक्ष येथे देखील जास्तीत जास्त सहा कर्मचाऱ्यांची उपस्थिती प्रमाणित करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास तशी सूचना नियंत्रण कक्षास लगेच प्राप्त होऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.

एकुणच विद्यापीठाने केवळ परीक्षा कक्षापुरतेच नव्हे, तर संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणली आहे. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे ते डिजिटल माध्यमातून प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे मुद्रित (प्रिंटआऊट) करताना पूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण (रेकॉर्डिंग) होईल. तसेच परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका जमा करून त्या सील करे पर्यंतची देखील सर्व प्रक्रिया सीसीटीव्हीच्या थेट निगराणीखाली पार पडणार आहे. या त्रिस्तरीय तांत्रिक सुरक्षा चक्रामुळे परीक्षेत होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संभाव्य गैरप्रकारांना आणि अनियमिततेला कायमचा पायबंद बसणार आहे. भविष्यात सर्व परीक्षा केंद्रांवर पूर्ण क्षमतेने अशाच प्रकारची ए.आय. आधारित सीसीटीव्ही देखरेख प्रणालीची व्यवस्था कार्यान्वित करण्याचे विद्यापीठ परीक्षा विभागाचे नियोजन आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version