अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी
| माणगाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर भुवन गावच्या हद्दीत भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागूनझालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू होऊन दुचाकी चालक जखमी झाला. सदरील अपघात गुरुवार (दि. 18) रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद महादेव रामा शिंदे (वय-54) रा. निळज ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी महादेव रामा शिंदे यांचा मुलगा मुकेश व सून अरुणा असे कोलाड येथून घरगुती सामान घेऊन त्यांची मोटार सायकल क्र. एम.एच. 06 बी.एफ2683 या गाडीने घरी निळज येथे महामार्गाने येत असताना भुवन गावच्या थांब्याजवळ त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे भरधाव वेगाने चालवून घेऊन जात असताना मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांची सून अरुणा शिंदे (वय-30) रा. निळज या महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा मोटार सायकल चालक मुकेश शिंदे (वय-32) रा.निळज हा गंभीर जखमी झाला. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.