| नेरळ | वार्ताहर |
नेरळ बाजारपेठेमधील विजेच्या खांबाला बुधवारी (दि.21) पहाटे साडे पाच वाजता अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत विजेचा खांब अर्धवट अवस्थेत कोसळला असून त्यामुळे नेरळ बाजारपेठेमधील विजेचा प्रवाह दिवसभर खंडित होता.
माथेरान नेरळ रस्त्यावर पोतदार कुटुंबाच्या घराच्या बाजूला उभा असलेला विजेचा खांब अज्ञात वाहनाच्या धडकेत अर्धवट कोसळला. अज्ञात वाहनाच्या धडकेत विजेचा खांब अर्धवट कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि नेरळ बाजारपेठ भागातील विजेचा प्रवाह खंडित झाला. अज्ञात वाहन नेरळ येथून पसार झाल्याने त्याची कोणतीही माहिती नाही. मात्र, नेरळ बाजारपेठ भागातील विजेचा खांब अर्धवट कोसळल्याने नेरळमधील विजेचा प्रवाह खंडित झाला. त्याबद्दल नेरळमधील महावितरण कार्यालयाला कळविण्यात आले. मात्र, दुपारी बारा वाजता महावितरणाचे कर्मचारी नवीन विजेचा खांब घेऊन घटनस्थळी पोहचले. त्यानंतर नवीन विजेचा खांब उभा करणे आणि वीजवाहक तारा ओढणे ही कामे पूर्ण झाल्यावर महावितरण कर्मचार्यांनी विजेचा खांब कापून काढण्यात आला. त्यानंतर सायंकाळी नेरळ गावातील विजेचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला.