रायगड जिल्ह्यात अग्रणी असलेली आदर्श नागरी सहकारी पतसंस्था सध्या आपला रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील व अध्यक्ष अभिजित पाटील यांची आनंद कोळगावकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.. संस्थेची उभारणी करताना आलेले अनुभव, संस्थेची ध्येयधोरणे आणि भविष्यातील योजना याबाबत ही मनमोकळी बातचीत….
प्रश्न: सर्वप्रथम आदर्श पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवाबद्दल तुमचे व्यक्तिश: आणि टीम आदर्शचे अभिनंदन! आपण सहकार खात्यातून ऑडिटर म्हणून रिटायर्ड झाल्यानंतर, पतसंस्था काढण्याचे कसे मनात आले?
सुरेश: माझा पहिल्यापासूनच पिंड, स्वभाव सामाजिक कार्यकर्त्याचा. शेतकरी कामगार पक्षात असताना माझे घनिष्ट संबंध मा. दत्ता पाटील (दादा), मा.प्रभाकर पाटील (भाऊ), मित्रवर्य भाई जयंत पाटील यांच्याशी आले. पक्षाच्याच माध्यमातून मला अलिबाग नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी मी अलिबाग अर्बन बँकेतही संचालक म्हणून काम केले. नगरपालिकेत मला काम करायला फ्री हँड होता परंतु अर्बन बँकेत मात्र तसा फ्री हँड नव्हता. ऑडिटर म्हणून प्रदीर्घ अनुभव होता. सहकारातील कामकाज, त्यातील खाचाखोचा माहित होत्या. त्यामुळे आपल्याला काम करायला फ्री हँड मिळेल अशी आर्थिक संस्था असावी असा विचार मनात आला आणि त्यातूनच आदर्श पतसंस्थेचा जन्म झाला. 1998 साली शुन्यातून आदर्श पतसंस्थेचा कारभार सुरू झाला. आजमितीला ठेवी 325 कोटींच्यावर, एकत्रित व्यवसाय 560 कोटीं पर्यंत 30000 सभासद, 16 शाखा, 160 कर्मचारी व पिग्मी प्रतिनिधी, असा आदर्शचा व्याप वाढला आहे. “आदर्श एक विश्वास“ हे आदर्शचे ब्रीदवाक्य आहे. गेली 25 वर्ष आदर्शवर ग्राहकांचा, सभासदांचा असलेला विश्वासच आम्ही सार्थ ठरविला आहे. आदर्शच्या आजवरच्या या भरभराटीमध्ये आजवरचे आजी-माजी सर्व संचालक, कर्मचारी, सभासद ,ठेवीदार, कर्जदार, पिग्मी एजंट या सर्वांचेच अथक परिश्रम याचा सिंहाचा वाटा आहे.
प्रश्न: सभासद नोंदणीचे मापदंड काय लावता?
सुरेश: आमच्या पतसंस्थेचे सभासदत्व कोणीही घेवू शकतो. सभासदत्व देताना आम्ही जात धर्म, पक्ष किंवा इतर कसलाही मापदंड लावत नाही. ज्याला संस्थेचा सभासद व्हावे वाटते, त्या सर्वांसाठी आदर्श पतसंस्था खुली आहे. आमच्या या धोरणामुळेच आजमितीला आमचे 30,000 हून अधिक सभासद झाले आहेत.
प्रश्न: ठेवी स्वीकारताना कोणती काळजी घेता ? विशेषत: कॅश स्वीकारताना.
सुरेश: सरकारच्या नियमाप्रमाणे एखादा सभासद दर दिवशी रू 2,00,000/- पर्यंत इतकी रोख रक्कम आपल्या बचत खात्यामध्ये भरू शकतो. चेकद्वारे पैसे भरणा करायला कोणतीही मर्यादा नाही. पैसे भरताना जो नियम तोच नियम पैसे काढताना आहे. आदर्श शासनाकडून आलेले आदेश समोर ठेवूनच कामकाज करते.प्रत्येक सभासदाला बचत खाते उघडणे अनिवार्य आहे आणि सर्व व्यवहार बचत खात्याद्वारेच करणे अपेक्षित आहे. बचत खाते उघडताना केवायसी (Know Your Customer) पूर्ण करणे अनिवार्य आहे. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आमच्या या धोरणामुळेच गेल्या नोटबंदीच्या वेळी आम्हाला कुठल्याही पध्दतीच्या अडचणीला तोंड द्यावे लागले नाही. त्यावेळी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी कानावर आल्या, परंतु आमचे व्यवहार सचोटीवर आधारित असल्याने आम्हाला कसलाच प्रॉब्लेम आला नाही. आदर्श पतसंस्था ही सर्वसामान्य माणसांची पतसंस्था आहे. आमचे सभासद हे प्रामुख्याने राज्य/केन्द्र सरकारी कर्मचारी, खाजगी आस्थापनातील कर्मचारी, लहान/मोठे व्यापारी, विकासक, बिल्डर्स, डॉक्टर्स, वकील आणि शेतकरी वर्गातील, असे सर्व थरातील आमचे सभासद आहेत. त्यांच्या लहानमोठ्या ठेवींवरच आदर्श उभी राहीलीय. आम्ही अतिमोठ्या रकमेच्या ठेवी एकाच सभासदाकडून घेणे शक्यतो टाळतो. आणि तशी ठेव घेतलीच तर ती फक्त चेकद्वारेच घेतो. म्हणूनच आम्ही नेहमी सागतो की, आदर्शचा कारभार पूर्णपणे पारदर्शी आहे.
प्रश्न: पतसंस्थांकडच्या ठेवींना टीडीएस नसते असे का?
अभिजित: खरं आहे, आमच्याकडील ठेवींना मॅच्युरीटीवेळी टीडीएस कपात नसते. परंतु ज्या पतसंस्थांचे वार्षिक उत्पन्न(नफा) रू.50 कोटींच्यावर असतो, त्यांना सभासदांच्या ठेवीवर टीडीएस कपात करावी असे आयकर खात्याचे नियम आहेत. पण आता तरी ते आम्हास लागू नाहीत. भविष्यात आयकराचे नियमात काय सुधारणा होतील ते कोणीही सांगू शकत नाहीत. जवळजवळ सर्वच पतसंस्था कॉम्प्युटराईज्ड आहेत, काही संस्था कोअर बँकींग करतात शिवाय रोज बाजारात येणारी सॉफ्टवेअर्स, इंटरनेट बँकींग यामुळे कुठलाच व्यवहार स्वच्छ ठेवला जातो.
प्रश्न: व्याजदर कसा ठरवता? इतरांशी स्पर्धा करता की स्वत:चा दर स्वत:च ठरविता. सरकारच्या काही गाईडलाईन्स आहेत का?
सुरेश: ठेवी आणि कर्ज दोन्हींचे व्याजदर ठरविण्यासाठी आमचे व शासनाकडून काही मापदंड आहेत. ठेवींवरचे व्याज (देणे) आणि कर्जावरचे व्याज (येणे) याचा दर महिन्यांत आढावा घेण्यात येतो. ठेवी व कर्जाचे ॲवरेज दर काढून मार्जिन तपासूनच थोडक्यात फॉर्मुल्यानुसार दर ठरविण्यात येतात .एकंदर व्यवहाराच्या 3 ते 4:5 टक्के इतका दुरावा असावा असा मापदंड आहे. पण आदर्श फारच कमी म्हणजेच 3% चे जवळपास दुरावा ठेऊन ठेवीदारांचे व कर्जदारांचे हित जोपासत आहे. सरकारच्या वतीने नियामक मंडळाकडून या बाबतीत ठेवीवर व कर्जावर जास्तीतजास्त किती व्याजदर द्यावा व घ्यावा हे वेळोवेळी ठरवून दिले जाते त्यानुसार आम्हास निर्णय घेता येतात. स्पर्धेबाबत म्हणाल तर आमची कोणाशीही स्पर्धा नाही. असलीच तर स्पर्धा आमच्याशीच आहे. आणखी जास्तीत जास्त चांगली सेवा ग्राहकांना कशी देता येईल, यासाठीची आमची स्पर्धा आमच्याशीच आहे.
प्रश्न: कर्ज देताना काय काय पथ्ये पाळावी लागतात. चांगला कर्जदार कसा ओळखता?
अभिजीत: खरं सांगू, चांगला, प्रामाणिक कर्जदार शोधणे ही आजकालची सर्वात मोठी समस्या पतसंस्थांपुढे आहे. कर्जदार निवडताना जात, धर्म, गावचा, ओळखीचा, नातेवाईक यापैकी कुठलाही फॅक्टर विचारात न घेता केवळ गुणवत्तेवरच सुरक्षित कर्जपुरवठा केला तरच कर्जवसुली चांगली होतै. कर्ज घेताना सगळेच गोड बोलतात, सर्व काही ऐकून घेतात. त्यावेळी कर्जदार हा मांजराचे भूमिकेत आपणा समोर असतो. परंतु नतर कर्जफेड करताना मात्र हप्त्यासाठी अनेकवेळा मागे लागावे लागते. त्यावेळी त्याची वाघाची भूमिकेत डरकाळी पहायला मिळते.
चांगल्या कर्जदाराचे अनेक निकष आहेत. 1. कर्जदाराला कर्ज कशासाठी हवे आहे. त्याने सांगितलेले कारण आणि कर्जाची रक्कम हे किती योग्य आहे हे तपासणीतून त्याचे उत्पन्नाचे मार्ग व हप्ता भरण्याची कुवत तपासूनच कर्ज दिले जाते. 2. कर्जदार कर्जाची नियमित परतफेड कशी करणार हे तपासावे. कर्जदार जसा कर्जफेडीसाठी सक्षम असावा तसेच जामिनदारही सक्षम असावेत. 3. कर्जासाठी तारण म्हणून स्थावर मालमत्ता निर्धोक असावी. याची छाननी वकीलाकडून करून घ्यावी. मालमत्तेची मार्केट व्हॅल्यु किती याचीही व्हॅल्युअरकडून तपासणी करून घ्यावी. तारण ठेवलेली स्थावर मालमत्ता रजिस्टर्ड मॉरिग्रेजने तारण करून घ्यावी. सातबारावर बोजा चढवून घ्यावा.
इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, कर्ज जरी तारणी कर्ज असले तरी कर्जदाराने कर्जाची परतफेड मात्र नियमीत हप्त्याने करावी. आम्ही कर्जाच्या सुरक्षेततेसाठी तारण घेतो. कर्ज थकले तर शेवटचा उपाय म्हणून तारण घेतो. तारणाचा लिलाव करणे याला अनेक कायदेशीर पाय-या असतात. त्यात नाहक विलंब होतो. शिवाय तारणाचा लिलाव करून कर्ज वसूल करणे हे पतसंस्थेचे काम नाही. त्यामुळे नियमित सांगितलेल्या हप्त्याने कर्ज कसे फेडतील हेच आम्ही पाहतो. अर्थात कर्जदाराची सामाजिक पत वाढावी आणि त्याला आर्थिक शिस्त लागावी हाही उद्देश त्यातून सफल होतोच. घेतलेले कर्ज कर्जदाराने नियमित फेडावेच. परंतु जर का कर्जदाराला बांधून दिलेल्या हप्त्याव्यतिरीक्त जादा पैसे भरणे शक्य असले तर ते त्याने नक्की भरावे. असे केल्याने जादाची जी रक्कम असेल ती थेट मुदलातून वजा होते आणि परिणामी व्याज जास्त भरावे लागत नाही. कर्ज देताना आम्ही वरील सर्व बाबींचा विचार करूनच कर्जवाटप करतो. आणि हो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे पतसंस्था चालवताना फेस रीडींग महत्वाचे. कोण कर्ज भरणार आहे, कोण प्रामाणिक आहे, कोण कर्ज बुडवणार आहे…..हे सारं फेस रीडींगवर आम्ही जाणतो. अर्थात त्याकरता बाजारात त्याची पत तपासूनेचा होमवर्कही आवश्यक आहे. कर्ज देताना नातीगोती, जातधर्म, गाववाला, मित्र, पक्ष अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता कर्जवाटप करतो.
प्रश्न : जामिनदाराची जबाबदारी कुठपर्यंत असते? कर्जदाराच्या मृत्युपश्चात वारसदाराची जबाबदारी किती?
अभिजीत: आमच्या लेखी जामिनदार हासुध्दा एक सह-कर्जदारच असतो. कर्जदाराने जर कर्ज फेडले नाही तर ते फेडण्याची जबाबदारी जामिनदाराची असते. कर्जफेडीबाबतीत जसं कर्जदाराचा पगार, स्थावर आदी मालमत्तेवर टांच येते, तशीच टांच जामिनदाराच्या पगारावर/मालमत्तेवरही येवू शकते. कायद्याच्या लेखी कर्जदार व जामीनदार सारख्याच जोखीमीचे असतात. म्हणून माझे नेहमीच सांगणे असते की कधीही, कुठेही जामीनदार म्हणून राहताना विचारपूर्वक रहावे. आपण ज्याला जामीन राहतो त्याचे इनकम, त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड, त्याच्या सवयी, त्याची व्यसने, त्याचा स्वभाव, त्याची स्थावर जंजम मालमत्ता, या सर्व बाबीचा विचार करूनच जामीन रहावे. भावनेच्या आहारी जावून किंवा ‘नाही’ कसं म्हणायचे, असा विचार करून जामीन राहू नये.
प्रश्न: कर्जवसुली करताना कुठले मार्ग अवलंबीता ?
अभिजीत: मुळात कर्ज देतानाच आम्ही ते कर्ज सुरक्षित कसे करता येईल ते बघतो. यासाठी आम्ही रजिस्टर्ड तारणी कर्जच देतो. शिवाय दोन जामिनदारही घेतो, पैकी एक नोकरदार असावा. यामुळे आम्ही दिलेली सर्वच कर्जे सुरक्षित आहेत, परिणामी आमच्याकडील सर्व ठेवी सुरक्षित आहेत. कर्जदाराला हप्ता भरण्यासाठी वेळेवर आठवण दिली जाते. थकलेल्या कर्जहप्त्यांसाठी वारंवार पाठपुरावाही केला जातो. थकलेल्या हप्त्यांबद्दल कर्जदाराला तसेच जामिनदाराबरोबरही पत्रव्यवहार केला जातो. कर्जदाराच्या कुटुंबासोबत, मित्रपरीवारासोबतही समुपदेशन करतो. कर्जदाराच्या काही योग्य अडचणी असतील तर आम्ही त्याही समजून घेतो. कर्जफेड कदाचित वेळेवर नसेल होत तर मुदतही देवू. परंतु कर्ज मात्र कुठल्याही परीस्थितीत फेडावेच लागेल. कर्ज थकल्यानंतर मात्र कर्जदारावर कायदेशीर उपाययोजना केल्याशिवाय संस्थेपुढेही इलाज नसतो.