आनंदाचा शिधा पोहोचला हो

30 टक्के वाटप, 70 टक्के प्रतिक्षेत

| अलिबाग । प्रतिनिधी ।

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गरीबांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो चणाडाळ, साखर, खाद्यतेल व रवा देण्याची सुरुवात रायगड जिल्ह्यामध्ये 11 एप्रिलपासून सुरु केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 30 टक्के शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळाला आहे. उर्वरित रेशनकार्डधारकांना हा शिधा वाटपाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मोठा गाजावाजा करून राज्य सरकारने गोरगरीबांसाठी स्वस्त दरात आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वी हा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहचेल अशी आशा होती. परंतू  शिधा रायगड जिल्ह्यामध्ये उशीरा पोहोचला. त्यात डाळ कमी तर साखर नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शिधा वाटप लांबणीवर गेले. अखेर 10 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात आनंदाचा शिधा शंभर टक्के उपलब्ध झाला. रायगड जिल्हयामध्ये 4 लाख 31 हजार 42 लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शर्तीचे प्रयत्न केले. जिल्ह्यातील गोदामातून 1 हजार 440 रास्त भाव दुकानांपर्यंत हा साठा पोहचविण्यात आले. त्यानंतर 11 एप्रिलपासून जिल्ह्यामध्ये आनंदाचा शिधा 100 रुपयांमध्ये वितरीत करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 30 टक्के शिधा पत्रिकाधारकांपर्यंत ही योजना पोहचली असून अन्य 70 टक्के लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम केले जात आहे.

रेशन दुकानात गर्दी
आनंदाचा शिधा घेण्यासाठी जिल्हयातील रास्त भाव दुकानांमध्ये ग्राहकांची  गर्दी होऊ लागली आहे. 100 रुपयांमध्ये रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल मिळत असल्याने मोठ्या आवडीने लाभार्थी शिधा घेण्यासाठी दुकानांमध्ये येत आहेत. दिवाळीपासून ही योजना सुरु केली आहे. त्यानंतर गुढी पाडव्याला आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधा देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. शासनाची ही योजना चांगली आहे. गरीबांना एक अधार देण्याचा प्रय्त्न केला जात आहे.  मात्र या शिधा वेळेवर मिळत नसल्याची खंत लाभार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात 100 टक्के आनंदाचा शिधा उपलब्ध झाला आहे. अनेक भागात वितरणाला सुरुवात केली आहे. 30 टक्के ग्राहकांना शिधा वाटप झाला असून  उर्वरित शिधा पुढील आठवड्यापर्यंत वितरीत होण्याची शक्यता आहे.

गोविंद वाकडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी
Exit mobile version