अनंत गीते बहूमतांनी निवडून येणार: वैभव चांदे

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांकडूनदेखील त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनंत गीते या निवडणूकीत बहूमतांनी निवडून येतील असा विश्‍वास शेकाप पोलादपूर तालुका चिटणीस वैभव चांदे यांनी व्यक्त केला.

गीते यांना निवडून देण्यासाठी शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागले आहेत. गावोगावी जाऊन वेगवेगळ्या बैठकीच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केेले जात आहे. शेतकरी कामगार पक्ष अनंत गीते यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पोलादपूर तालुक्यात पहिली प्रचार फेरी पूर्ण झाली आहे. या प्रचाराच्यावेळी गीते यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे गावो, वाड्यांमध्ये जल्लोषात स्वागत केले जात आहे. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांच्या आवाहनानंतर पोलादपूर तालुक्यातील शेकाप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. रात्रीचा दिवस करून प्रचार करीत आहेत. माजी आ. पंडित, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील आदी नेते मंडळीमार्फत बैठका घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

अनंत गीते यांनी गेली अनेक वर्षे केंद्रीय मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. प्रशासनाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. जनमानसात राहणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. गीते यांचे पोलादपूरमध्ये आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. मतदारांसह कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी स्वंयस्फुर्तीने पुढे येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणूकीत अनंत गीते बहूमतांनी निवडून येतील असा विश्‍वास आहे, असे शेकाप पोलादपूर तालुका चिटणीस वैभव चांदे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version