शिंदे गटात अंतर्गत राजकारण तापले
| अलिबाग | प्रतिनिधी |
शिवसेना (शिंदे गट) अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांना काविर जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खानाव–नागाव येथील गोंधळी यांच्या रिसॉर्टवर झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, माजी सभापती दिलीप भोईर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत झालेल्या तीन आढावा बैठकीत विविध मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र, रामराज मतदारसंघातून अनंत गोंधळी यांचे नाव स्पष्टपणे वगळण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसमधून मोठ्या अपेक्षेने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेल्या अनंत गोंधळी यांना अलिकडच्या काळात पक्षांतर्गत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. त्यांना स्वतःची ग्रामपंचायतही राखता न आल्याने त्यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची जिल्हा परिषद उमेदवारी कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गोंधळी यांच्या घटलेल्या राजकीय वजनाचा फायदा घेत आमदार महेंद्र दळवी आपल्या पसंतीचा उमेदवार पुढे आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निर्णयामुळे शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयावर अनंत गोंधळी यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली तरी तालुक्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही पदाधिकाऱ्यांनी या निर्णयामुळे पक्ष संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता निर्माण होऊ शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.







