कँन्सरग्रस्तांना पनवेलच्या अनन्याने केले केसदान

जि.प.सीईंओकडून कौतूक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा, उसर्ली खुर्द येथील सहावी इयत्तेत शिकणार्‍या अनन्या अनिल पवार या 12 वर्षीय विद्यार्थिनीने आपले केस कॅन्सर रुग्णांसाठी दान करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अनन्या पवार या विद्यार्थिनीने केलेल्या कार्याचे कौतुक करीत तिचा बुधवारी जिल्हा परिषदेत सत्कार केला.

अनन्या पवार हीचे मोठे झाल्यावर समाजाची सेवा करण्यासाठी जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न असून, तिला केस दान करण्याची कल्पना आत्ये बहिणीने दिली. त्यांनतर तिने केस दान करण्याची कल्पना आई, वडिलांना सांगितली. त्यांनीही आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी कॅन्सर ग्रस्तांना मदत करणार्‍या मुंबईच्या मदत फाऊंडेशन या संस्थेशी संपर्क साधण्यात आला. मदत फाऊंडेशन गोरगरीब कॅन्सरग्रस्त बालकांना मोफत विग तयार करून देते. या संस्थेकडे अनन्या पवार या विद्यार्थिनीचे कापलेले केस देण्यात आले आहेत.
अनन्या पवार हिने स्वतःचे केस कॅन्सर रुग्णांसाठी दान केल्याची माहिती मिळताच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार बुधवारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी अनन्या पवार हिच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, मार्गदर्शन केले.

यावेळी शिक्षण विभाग सहाय्यक उपसंचालक शेषराव बडे, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे, जिल्हा समन्वयक संदीप वारगे, केंद्रप्रमुख निंबाजी गीते, मुख्याध्यापिका प्रगती म्हात्रे, वर्गशिक्षिका चीत्रारेखा जाधव, पाणी व स्वच्छता विभाग संवाद तज्ञ सुरेश पाटील, अनन्या पवार हीची आई विद्या अनिल पवार यांचेसह उसर्ली शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version