घारापुरी बेटावरील प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील सुप्रसिद्ध घारापुरी बेटावर प्राचीन अशी बारा ज्योर्तिलिंग आहेत. मुबंईपासून अवघ्या 10 कि.मी. अंतरावर घारापुरी बेट आहे. तेथे अतिप्राचीन बारा शिवलिंग आहेत. ठिकठिकाणी उत्खन्नातून आढळून आलेली छोटी-मोठी शिवलिंग इतिहासाची साक्ष देणारी आहेत. अशा या शिवलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक, पर्यटकांची गर्दी उसळते. येथे अतिप्राचीन कोरीव लेण्याही पहावयास मिळतात. काळ्या दगडात कोरलेल्या या लेण्यांमध्ये शिवाची विविध रूपे दाखविण्यात आली आहेत. महेशमूर्ती, अर्धनारीश्वर, कल्याणमूर्ती, अंधकासुरवध, गंगावतरण, उमामहेश्वर मूर्ती, योगीश्वर आदी शिवाची विविध कोरीव ऐतिहासिक शिल्पे पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांही आवर्जून हजेरी लावतात.

येथील प्रमुख लेण्यांच्या गाभाऱ्यात प्रचंड शिवलिंग आहे. चारही दिशेने प्रवेशद्वार असलेल्या गाभाऱ्यात शिवलिंगांच्या बाजूलाच शिवमूर्ती आहे. साधारणत: चार फूट उंचीचे व चार फूट व्यासाचे हे शिवलिंग सर्वानाच आकर्षित करीत असते. या शिवलिंगाच्या बाजूलाच थंड पाण्याचा हौद आहे. या हौदाच्या बाजूला दोन फूट उंचीचे व तीन फूट व्यासाचे शिवलिंग आहे. मनोहारी शिवलिंगांच्या व मुख्य लेण्यांच्या पश्चिमेकडे असलेल्या अष्टमातृकांच्या गाभाऱ्याशेजारी तिसरे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या प्रवेशद्वारावरच भग्न अवस्थेतील दोन पाषाणी सिंह पहारेकरी म्हणून उभे आहेत. मुख्य लेण्यांशिवाय येथे उपलेण्याकडे जाताना आणखी एक शिवलिंग दृष्टीस पडते. साधारणत: सध्या दोन मीटर घेराचे हे शिवलिंग भव्य सभामंडपात विराजमान आहे. मुख्य लेण्यांच्या डोंगराच्या विरोधात आणखी एक डोंगर आहे. या डोंगरातच सीतागुंफा आहे. या गुंफा परिसरातही प्राचीन शिवलिंग विराजमान आहे. अशाप्रकारे घारापुरी बेटावर पुरातन ऐतिहासिक व चैतन्यमय व सजीव भासणारी बारा शिवलिंगे आहेत.

Exit mobile version