…अन् रिक्षातच तिने दिला बाळाला जन्म

बाळ-बाळंतीण सुखरुप; नर्सच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

एका बाजूला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, दुसर्‍या बाजूला ‘त्या’ गर्भवतीच्या प्रसववेदना तीव्र होत्या. ती मदतीचा हात मागत होती. रिक्षाचालकानेही प्रसंगावधान दाखवत रिक्षा थांबवली. तो दिवस होता, गुरुवार, वेळ रात्री पावणे नऊ वाजता. रस्त्यावर गर्दी वाढली. मानीफाटा येथे आपल्या बहिणीकडे राहण्यास आलेल्या जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सने महिलेची स्थिती पाहून माणुसकी दाखवत रिक्षातच तिची प्रसूती केली. प्रसूतीसाठी लागणारे कोणतेही उपकरण उपलब्ध नसतानाही नर्सच्या सतर्कतेमुळे बाळ-बाळंतीणीला जीवदान मिळाले. ते नवजात अर्भक मुलगी असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स स्वाती मुरलीधर मयेकर त्यांचे कर्तव्य बजावून आपली बहीण अ‍ॅड. उत्तरा मयेकर यांच्याकडे मानीफाटा येथे आल्या होत्या. पावसाने जोर धरल्याने घरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सर्वत्र अंधार होता. त्यामुळे दोन्ही बहिणी घरात गप्पागोष्टी करीत बसल्या होत्या. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर एक रिक्षा आली. रिक्षातील एक महिला जोरजोराने ओरडून मदतीचा हात मागत होती. वाचवा-वाचवा असे जोराने सांगत होते. रिक्षातील महिलेचा आवाज उत्तरा मयेकर व स्वाती मयेकर यांच्या कानी पडला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्या रिक्षात एक गरोदर महिला दिसली. तिला प्रसूती वेदना असह्य झाल्याने ती जोरजोराने ओरडत होती. स्वाती मयेकर यांनी जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी ती महिला एका अर्भकाला जन्म देण्याच्या तयारीत होती. तिच्या पोटातील बाळाने मान बाहेर काढली होती. मात्र, पावसामुळे रुग्णालयात पोहोचणेदेखील कठीण होते. तिला रिक्षातून बाहेर काढणेदेखील धोक्याचे होते. अखेर स्वाती मयेकर यांनी माणुसकी दाखवत त्या महिलेची रिक्षातच प्रसूती केली. त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर नाळ कापण्यासाठी काहीही साधन नसल्याने त्यांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून त्या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. आज ती महिला व तिची मुलगी सुखरूप असून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

त्या महिलेचे नाव सोनाली शैलेश वाघमारे असून, त्यांचे गाव म्हात्रोळी हे आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयात नेत असताना, अचानक पोटात दुखू लागले. ती रस्त्यातच प्रसूत होण्याच्या मार्गावर होती. मात्र, जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स स्वाती मयेकर यांनी दाखवलेला धाडसीपणा आणि माणुसकीमुळे सोनालीची प्रसूती चांगली झाली.

महिलेवर उपचार सुरू
संबंधित महिलेवर त्या स्थितीत प्रसूती करण्याचे आव्हान होते. रिक्षामध्ये प्रसूती करताना कोणतीही इजा पोहोचू द्यायची नव्हती. त्यांना कोणतेही इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे होते, असे स्वाती मयेकर यांनी सांगितले.
Exit mobile version