अन् अश्रुंचा बांध पुन्हा एकदा फुटला

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना श्रद्धांजली

| रसायनी | वार्ताहर |

19 जुलै 2023 रोजीच्या कालरात्री इर्शाळवाडीची भयानक दुर्घटना घडून 84 जणांचा मृत्यू झाला होता. आज एक वर्ष पूर्ण होत असताना मृत्युमुखी पडलेल्या वारसांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि एकच शांतता पसरली होती. हे भयानक चित्र आज इर्शाळवाडी येथील कंटेनर हाऊसमध्ये श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात दिसून आले.

इर्शाळवाडीचा डोंगर कोसळून भूस्खलन झाल्याने 84 जणांचे जीव मातीत गेले, तर 83 जनावरेदेखील दगावली. 49 घरे आणि 7 गुरांचे गोठे यांची हानी झाली. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने तात्पुरत्या कंटेनर हाऊस येथे बांधण्यात आलेल्या सभागृहात श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मृतांच्या आठवणींनी अश्रू अनावर झाले होते. उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, अप्पर तहसीलदार पूनम कदम, उपअभियंता प्रशांत राखाडे, अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साठेलकर व त्यांची टीम, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, समाजसेवक सचिन ओसवाल, चौक सरपंच रितू ठोंबरे, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, पोलीस निरीक्षक मोरे, मंडळ अधिकारी अशोक सुसलादे, तलाठी मुग्धन, कावरखे, अभिजित हिवरकर, पांपटवार, ग्रामविकास अधिकारी एस.पी. जाधव, मृतांचे वारस व नातेवाईक, मित्रपरिवार, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, चौक ग्रामपंचायत सदस्य, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी, 84 जणांचे सामुदायिक वर्षश्राद्ध करण्यात आले. आपल्या मृतांच्या आत्म्याला शांती समाधान मिळावे, अशी प्रार्थना करताना सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. यात जी 22 बालके आपल्या आईबाबांना मुकली आहेत, त्या मुलांसमोर दुःख आणि दुःखच दिसत होते. शून्य नजरेत ही मुले अग्निकुंडाकडे पाहात होती. या अग्निकुंडात आपल्या आईबाबांना बघत होती. यावेळी आलेल्या नातेवाईक, मित्र परिवार यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही दुःख अनावर झाले होते. असा प्रसंग कुणाच्याही जीवनात नसावा अशी प्रार्थना करताना सर्व दिसत होते. सध्या ही कुटुंबे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार, चौक हद्दीतील डायमंड पेट्रोल पंप येथे कंटेनर हाऊसमध्ये राहात आहेत. लवकरच नवीन पुनर्वसन घरात राहण्यासाठी जातील, असे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांनी सांगितले.

Exit mobile version