अन्‌‍ तीन वर्षाची चिमुकली आई-बाबांना सापडली

रिक्षा चालकांनी जपली माणुसकी

| अलिबाग | प्रतिनिधी |

रिक्षा चालक, अलिबाग पोलीस आणि महिला सफाई कामगार यांनी जपलेल्या माणुसकीमुळे अवघ्या तासाभरात तीन वर्षाच्या मुलीचे नातेवाईक सापडले. ही घटना मंगळवारी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी सोशल मिडीयाचा वापर केल्याने मुलीच्या नातेवाईकांचा शोध लागला.

एक लहान मुलगी अलिबाग एसटी स्टॅन्डकडून बायपास रस्त्याकडे चालत जात असल्याचे अलिबाग बायपास जवळील रिक्षा चालक नितीन घरत यांच्या लक्षात आले. त्या मुलीसोबत कोणीही नव्हते. त्यांनी रिक्षा थांबवून त्या मुलीची विचारपूस केली. परंतु ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. काही प्रमाणात ती घाबरलेली होती. रिक्षा चालक नितीन घरत यांनी त्या मुलीला रिक्षात बसवले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विचारपूस केली. तरीही तिचे नातेवाईक कोणीही सापडत नव्हते. अखेर नितीन घरत यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठले. अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रतिक पाटील यांना माहिती सांगितली. प्रतिक पाटील यांनी तातडीने वेगवेगळ्या मार्गाने मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर सोशल मिडीयावर मुलीचा फोटो पाठविण्यात आला. प्रतिभा पवार यांनी सोशल मिडीयावर मुलीचा फोटो पाहिला होता.

दरम्यान, अलिबागमध्ये एक इसम रडत असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. त्यांनी त्याची विचारपूस केली असता, मुलगी पोलीस ठाण्यात असल्याचे सांगितले. रिक्षा चालक, पोलीस आणि सफाई कामगार यांच्यामुळे अवघ्या एक तासात मुलीच्या नातेवाईकांचा शोध लागला. ओळख पटवून पोलिसांनी त्या तीन वर्षीय मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Exit mobile version