कंटेनर हाऊसमध्ये भरली अंगणवाडी

इर्शाळवाडी दुर्घटनग्रस्तांचा श्रीगणेशा सुरू

| रसायनी | वार्ताहर |

इर्शाळवाडीत 10 चिमुकल्यांच्या आठवणीत मोठ्या कंटेनर हाऊसमधील जागेत 15 चिमुकली पुन्हा नवीन अंगणवाडीच्या घरात रमल्याचे चित्र बघताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

19 जुलैच्या भयाण रात्रीत आपल्या आईवडिलांच्या कुशीत निर्धास्त विसावलेली दहा चिमुकली पाखरे कायमची आई वडिलांच्या कुशीत झोपली. हे भयाण वास्तव न विसरण्यासारखं आहे. या काल रात्रीत ज्यांचं नशीब बलवत्तर होते ती चिमुकली तात्पुरते पुनर्वसन केलेल्या कंटेनर हाऊसमधील अंगणवाडीत आपल्या शिक्षणाचा श्री गणेश करण्यासाठी रमली आहेत. या मोठ्या कंटेनरला अंगणवाडीचे रूप दिले आहे. परिपूर्ण अंगणवाडी तयार झाल्यावर तिचे मुलांच्या शिक्षणासाठी तहसीलदार आयुब तांबोळी, उपकार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक, गटविकास अधिकारी संदीप कराड, बाल विकास अधिकारी प्रवीण पाटील यांनी लोकार्पण केले. यावेळी विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, महादेव शिंदे, पर्यवेक्षिका संगमित्रा अंधोरीकर, आरती तेलखडे, अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते. यावेळी अनेकांच्या डोळयात अश्रुंच्या धारा वाहू लागल्या होत्या. या चिमुकल्यांचे स्वागत आरती करून करण्यात आले. चिमुकल्यांना खाऊ, खाऊचे डबे, शैक्षणिक साहित्य, बॅग देण्यात आल्या.नवीन जागेत आपण आहोत याची जाणीव त्यांना होती, अंगणवाडी सेविका चिमुकल्यांच्या आठवणीने व्याकुळ झाल्या होत्या.

Exit mobile version