राज्य शासनाच्या उदासीन धोरणांचा फटका;
मानधनवाढीसाठी राज्यातील सेविका संपावर
| पनवेल | वार्ताहर |
राज्यातील अंगणवाडी सेविकांना कर्मचारी ऑफ ग्रॅज्युईटी अॅक्ट नुसार ग्रॅज्युईटी मिळण्यास पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देवून दीड वर्षे होऊन देखील राज्य शासनामार्फत अत्यंत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविकांना काम करावे लागत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा रश्मी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन पार पडले. पनवेल पंचायत समितीच्या आवारात अंगणवाडी सेविकांनी गाण्याच्या माध्यमातून राज्य सरकारचा तसेच रायगड जिल्ह्यातील लोप्रतिनिधींचा निषेध व्यक्त करून लक्ष वेधून घेतले आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना कर्मचारी ऑफ ग्रॅज्युईटी अॅक्ट नुसार ग्रॅज्युईटी मिळण्यास पात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देवून दीड वर्षे होऊन देखील राज्य शासनामार्फत अत्यंत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविकांना काम करावे लागत असून मानधन वाढ करण्यात यावी, राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेणे, सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना अर्ध्या मानधनाइतकी पेन्शन सुरू करणे, अंगणवाडीमध्ये शिजविल्या जाणार्या पोषण आहारासाठी लागणार्या साहित्यासाठी येणारा खर्च महागाईमुळे वाढत असून देण्यात येणार्या रकमेत आणखी वाढ करण्यात यावी, अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजाकरिता मोबाईल संच देण्यात यावेत, सर्व मिनी अंगणवाड्या नियामित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे, अंगणवाडी कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अंगणवाडी कर्मचार्यावरील सक्ती बंद करावी, 30 दिवसांची भरपगारी रजा देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना मुख्यसेविका पदाकरीता पात्र करण्यात यावी अशा मागण्या घेवून अंगणवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
अंगणवाडी कर्मचारी 1975 पासून एबाविसे योजनेमध्ये पुर्णवेळ लहान बालक, किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेऊन, पुढची पिढी घडविण्याचे कर्तव्य बजावत आहे. अंगणवाडी कर्मचारी पुरक पोषण आहार, आरोग्य, पुर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, गृहभेटी व इतर संदर्भीय सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देत आहे. अंगणवाडी कर्मचार्यांना दिवसभर काम करुनही अनेक व्यवसायाच्या किमान वेतनापेक्षाही अत्यंत तुटंपुजे मानधन मिळत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये शासनाने जी मानधन वाढ केली होती, ती अत्यंत कमी होती. अंगणवाडी कर्मचार्यांना मिळणारे मानधन हे विविध योजनेंतर्गत तत्सम काम करणार्या कर्मचार्यांपेक्षा खुप कमी आहे. सध्याच्या महागाईमध्ये अत्यंत तुटपुंज्या मानधनात काम करणार्या अंगणवाडी कर्मचार्यांना जीवन जगणे कठीण होत असल्याच्या भावना शासनाकडे मांडून सेविकांनी सदर संप पुकारला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.