विद्यमान खासदारांविरोधात जनतेमध्ये रोष

। पनवेल । वार्ताहर ।

18 व्या लोकसभेची निवडणूक जनता विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी होणार आहे, असे रोखठोक प्रतिपादन करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. ते म्हणाले की, गेली दहा वर्षे मावळ लोकसभा मतदारसंघाचे दिल्लीतील लोकसभेत प्रतिनिधित्व करणार्‍या विद्यमान खासदारांविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे दिसून येते. तर महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची मशाल यंदाच्या निवडणूक बाजी मारणार, असे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण केल्यानंतर त्यांनी मत प्रकट केले.

पुढे ते म्हणाले की, मी जेव्हा आकुर्डी येथे आमचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा अर्ज भरण्याकरता गेलो होतो तेव्हा पाहिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मी प्रतिक्रिया दिली होती की संजोग वाघेरे पाटील निवडून येणारच. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची गर्दी होणं हे तर फार स्वाभाविकच होेते. परंतु, त्या ठिकाणी जो जनसागर लोटला होता त्यामध्ये बहुतांश उपस्थिती सामान्य नागरिकांची होती. यात लक्षणीय उपस्थिती महिला वर्गाची होती आणि तितकीच लक्षणीय उपस्थिती तरुणांची देखील होती.

मल्लिनाथ गायकवाड यांनी सुरुवातीच्या काळात एका खासदारांचा स्वीय सहाय्यक म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी करून दाखविली आहे. त्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यमान खासदारांच्या दोन टर्म बद्दल विचारले असता मल्लिनाथ गायकवाड यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने विशद केले की, एखाद्या लोकसभेच्या मतदारसंघाची व्याप्ती फार मोठी असते. त्यामुळे खासदाराने व्यक्तीसापेक्ष संपर्क ठेवून काम करणे त्यांच्याकडून अभिप्रेत नसते. परंतु, केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या उपक्रमांबाबत जर नागरिकांना समस्या असल्या तर त्या सोडवण्याची जबाबदारी खासदारांची असते. तसेच, राज्य सरकार विविध उपक्रम राबवत असते त्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळवून देणे, अनुमत्या प्राप्त करून देणे व या कामांवर अंकुश ठेवणे ही देखील त्यांची जबाबदारी असते. दुर्दैवाने विद्यमान खासदारांकडून या कुठल्याच पातळीवर समाधानकारक काम झालेले नाही.

विमानतळाच्या नामकरणचा वाद असेल, रेल्वे स्थानकातील ढीगभर समस्यांचा प्रश्‍न असेल, पासपोर्ट कार्यालयाच्या बाबतीत घातलेला घोळ असेल या सार्‍या गोष्टींतून विद्यमान खासदारांचा निष्क्रियपणा चव्हाट्यावर येतो. देशभरात देखील महागाई, बेरोजगारी, धार्मिक ध्रुवीकरण, केंद्रीय संस्थांचा अतिरेकी वापर, लोकशाहीला तिलांजली देत हुकूमशाहीकडे होत असणारा प्रवास या सार्‍यामुळे सामान्य जनतेत केंद्र सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे. हा सारा रोष असल्यामुळे ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे अत्यंत विनम्र आहेत. प्रचंड विकास कामाचे पाठबळ घेऊन ते मतदारांकडे जात आहेत. लोकाभिमुख कार्याचे बाळकडू त्यांना त्यांच्या कुटुंबातून प्राप्त झालेले आहे. त्यांच्या रूपाने 33 मावळ मतदार संघातील मतदात्यांना एक सक्षम विश्‍वासार्ह आणि खंबीर पर्याय उपलब्ध झालेला आहे.

Exit mobile version