संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पेणमध्ये संताप

13 ऑगस्टचा इशारा दुर्लक्षित; 17 ऑगस्टला पुतळा हटवण्याची नामुष्की

| पेण | प्रतिनिधी |

पेण नगरपालिकेने चार फाटा चौक, चिंचपाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने उभारलेल्या चौकातील प्रतीकात्मक पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादाला अखेर जनतेच्या आक्रोशानंतर पूर्णविराम मिळाला. पुतळ्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विद्रुपीकरण झाल्याचा आरोप करत शिवभक्त आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढता विरोध लक्षात घेता प्रशासनाला अखेर हा पुतळा हटवावा लागला.

मात्र, या प्रकरणात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 13 ऑगस्ट रोजीच पेणमधील काही सुज्ञ नागरिक आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे शिवभक्त नगराध्यक्षांची भेट घेण्यासाठी गेले होते. पुतळा बसवू नये, महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा पुतळा उभारावा आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती. मात्र, नागरिकांचा हा इशारा गांभीर्याने घेतला गेला नाही. अखेर अवघ्या काही दिवसांतच प्रशासनावर निर्णय मागे घेण्याची वेळ आली. दरम्यान, 13 ऑगस्टला इशारा मिळाला होता; तो ऐकला असता तर 17 ऑगस्टला पुतळा हटवण्याची वेळ आली असती का? असा सवाल आता पेणकरांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेनंतर नगराध्यक्षांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली. मात्र, केवळ दिलगिरी व्यक्त करून प्रकरण संपणार नसल्याची भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुतळा बसवण्यापूर्वी त्याची प्रतिकृती कुणी पाहिली? त्याला मंजुरी कुणी दिली? नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष का करण्यात आले? आणि या संपूर्ण प्रक्रियेत झालेला खर्च कोणाच्या जबाबदारीवर झाला, याची उत्तरे प्रशासनाने जनतेला द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

पेण हे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, त्याच्या सांस्कृतिक ओळखीचा उल्लेखही जिल्ह्याच्या संदर्भांमध्ये आढळतो. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने चौक उभारताना अधिक संवेदनशीलता आणि गांभीर्य अपेक्षित होते. जनतेच्या पैशातून निर्णय घ्यायचा, नागरिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करायचे आणि जनतेच्या संतापानंतर तो निर्णय मागे घ्यायचा, हा कारभाराचा पायंडा पडू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पुतळा हटवण्यात आला असला तरी या प्रकरणाने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत. पुतळा हटवणे हा जनतेच्या आंदोलनाचा विजय मानला जात असला, तरी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे.

बुंद से गई, वो हौद से नहीं आती!
पुतळा हटवता येतो, खर्चाचा हिशेब देता येतो; मात्र पेणच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग आणि दुखावलेल्या भावना केवळ दिलगिरीने पुसल्या जाणार का, याचे उत्तर आता प्रशासनाला द्यावे लागणार आहे.
Exit mobile version