जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देत केली गुन्हा दाखल करण्याची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात अर्वाच्च शब्द प्रयोग केला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अमित शहा यांच्याविरोधात शिवसेनेमध्ये संताप निर्माण झाला असून त्यांनी निषेध व्यक्त केला. अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली. याबाबत ठाकरे गटातील शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे. यावेळी मुरुड तालुका प्रमुख नौशाद दळवी, अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर, सतिश पाटील, मारुती भगत, रुपेश जामकर, अमिर ठाकूर, बाबु सय्यद, अजित गुरव, अजित मिसाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, तरुणांचे प्रेरणास्थान असणारे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढले. राज्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनाला ठेच पोहोचविणारे वक्तव्य अमित शहा यांनी केले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेमध्ये अमित शहा यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशाच्या संविधानिक जबाबदार विराजमान असलेले अमित शहा यांनी खालच्या पातळीवर भाष्य करणे शोभनीय नाही. अमित शहा यांच्या वक्त्यव्याचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले असून जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अमित शहा यांच्याविरोधात निषेध व्यक्त करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अलिबाग येथील अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.