लोकमान्य ग्राहक संरक्षण संस्थेकडून आंदोलनाचा इशारा
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडतील अशा अव्वाच्या सव्वा वीज बिलांनी पालीकर प्रचंड संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील असंख्य नागरीक व महिलांनी लोकमान्य ग्राहक संरक्षण संस्था (महाराष्ट्र)च्या नेतृत्वाखाली आवाज उठविण्यास सुरवात केली आहे.
विजसमस्येवर नागरिकांनी दंड थोपडले आहेत. लोकमान्य ग्राहक संरक्षण संस्थेने प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सुधागड तालुक्यात महावितरणाने ग्राहकांने वेठीस धरून ग्राहकांची झोप उडविली आहे. हा गरीब तालुका असल्याने एक वेळचे जेवण मिळणे गरिबांना कठीण झाले आहे. भरमसाठ लाईट बिल, दोन महिने परिस्थितीमुळे बिल न भरल्यास व्याज आकारणी असा मिळून येणारा बिल भरणे ग्राहकांना नाकीनऊ झाले आहे.
आदिवासी ठाकूर वर्ग काही प्रमाणात विजेबिना दिवस काढत आहेत. 10 हजार, 15 हजार, काहिंना तर 1 लाख बिल अंदाजे पाठविले जात आहे. काय आहे या गरिबांकडे? कोणती उपकरणे आहेत हे वरिष्ठांनी स्वतः येऊन पाहावे, बिल बरोबर आहे भरावेच लागेल अशी सक्ती केली जाते. नाहीतर मनमानी कारभार करीत नोटीस न देता लाईट तोडणे हे कितपत कायदयात बसते ते पाली महावितरणाने दाखवून दयावे, सुधागडातील जनता या समस्यांना कंटाळली आहे. आक्रोश चालू आहे. या आक्रोशाची दखल घेत लोक ग्राहक संरक्षण संस्थेने जनतेवर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठविला असून महावितरणाला लेखी पत्र देऊन मनमानी कारभार बंद करून ग्राहकांना दिलासा दयावा.
आठ दिवसांत विचार करून नोटीस न देता लाईट तोडणे बंद करावे आणि लेखी स्वरूपात कळवावे, न कळविल्यास संघटनेच्या वतीने ग्राहकांना घेऊन हजारोंच्या संख्येने न्याय मिळण्यासाठी ठिय्या आंदोलन छेडले जाईल. या बाबत तहसिलदार, पोलीस स्टेशन यांना ही निवेदन दिले आहे. लोकशाहिच्या मार्गाने आंदोलन होईल.
विज नियम कायदा 2003 नुसार विज ग्राहकांची विज तोडणी करण्याआधी त्यांना अगोदर 15 दिवसापूर्वी नोटिस देणे बंधणकारक असताना महावितरण सुधागड यांनी कोणतेही आगाऊ नोटीस न देता ग्राहकांची विज तोडली जाते. हे कृत्य बेकायदेशीर आहे. लवकरात लवकर या बाबींचे निवारण करण्यात यावे. ग्राहाकांच्या हक्कासाठी येत्या आठवडयात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल. वरील मुदयांचा गंभीरपुर्वक विचार महोदय आपणांसकडून करण्यात यावा तसेच संबंधित प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेकडून पदाधिकारी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष – अनुपम कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस- प्रशांत हिंगणे, रायगड जिल्हा अध्यक्ष- मंगेश यादव, तालुका अध्यक्ष – संदेश सोनकर, गोविंद शिंदे, खजिनदार- संदिप सिलीमकर, तालुका उपाअध्यक्ष – रोहिदास गायकवाड हे या आंदोलनाचे नेतृत्च करणार आहेत.