संतप्त व्यक्तींकडून आदिवासी तरुणाला मारहाण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हालिवली येथील स्मशानभूमीमध्ये जाऊन अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न स्थानिक आदिवासी लोकांनी हाणून पाडला होता. त्यामुळे अघोरी विद्या करण्यासाठी आलेले लोक संतापले आणि त्यांनी आदिवासी तरुणाला मारहाण केली. दरम्यान, त्याबद्दल आदिवासी संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कर्जत तालुक्यातील हालीवली आदिवासीवाडीतील स्मशानभूमीत दोन महिन्यांपूर्वी जादूटोणा आणि अघोरी कृत्याला विरोध करण्याची घटना घडली होती. त्यावेळी संबंधित लोकांनी तेथील एका आदिवासी युवकाला मारहाणदेखील केली होती. अघोरी विद्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र, संबंधित व्यक्तींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच अंधश्रद्धा जादूटोणा, अघोरी कृतीसंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघटनेने केली आहे. 11 जुलै 2025 रोजी हालिवली गावातील ग्रामस्थ राजेश गोपाळ शिंदे आणि त्याचे सहकाऱ्यांना कातकरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये जादूटोणा आणि अघोरी कृत्य करताना आदिवासी बांधवांनी विरोध दर्शविला होता. ही तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली, त्यावेळी कर्जत पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा प्रकार उधळवून लावला होता. त्यामुळे अघोरी विद्या करण्याचा डाव फसल्याने संतापलेल्या शिंदे याने मनात राग धरून जादूटोणा अघोरी कृत्याला विरोध करणाऱ्या समाजाच्या विष्णू गणपत वाघमारे या युवकाला रस्त्यात गाठून जबर मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष मालू निरगुडे तसेच बिरसा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अनंता वाघमारे, जिल्हा सचिव सचिन वाघमारे, दिलीप डाके, खालापूर तालुका कमिटीचे अध्यक्ष नारायण निरगुडे, सचिव रवी बांगारे, सहसचिव राजू सुतक, देहू दरवडा, तुळशीराम कवठे, अनिल पारधी, संजय पवार, रवी पवार, अविनाश वाघमारे, शंकर वाघमारे, नितीन पवार आदी कर्जत पोलीस ठाणे येथे जमले. आदिवासी समाज मोठ्या संख्येने कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन आदिवासी तरुणाच्या मारहाणीचा निषेध केला. त्यानंतर कर्जत पोलिसांनी राजेश गोपाळ शिंदे यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट, अंधश्रद्धा जादूटोणा, अघोरी कृतीसंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.







