| पनवेल | वार्ताहर |
दारूच्या नशेत आई-वडिलांशी सतत भांडण करणाऱ्या मुलाच्या गळ्यावर त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात ब्लेडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कामोठेत घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कामोठे पोलिसांनी मुलावर हल्ला करणाऱ्या पित्याविरोधात – गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अमोल जाधव (33) असे मुलाचे नाव असून, त्याच्यावर ब्लेडने वार करणाऱ्या त्याच्या पित्याचे नाव रवींद्र जाधव (68) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोलला दारूचे गंभीर व्यसन जडल्याने तो दररोज दारू पिऊन आई-वडिलांशी भांडण काढत होता. वडील रवींद्र हे कामावरून सोमवारी (दि. 14) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी परतले होते. या वेळी त्यांची पत्नी घरकामासाठी निघून गेली होती. वडील जेवणासाठी स्वयंपाकघरात गेले असता भांड्यांच्या आवाजाने अमोलला जाग आली. या वेळी दारूच्या नशेत असलेल्या अमोलने वडिलांना घरातून निघून जाण्यास बजावून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यावर वडिलांनी त्याला तूच घरातून निघ, असे म्हटले. त्यामुळे अमोल आणखी चिडला आणि वडिलांना पुन्हा मारहाण केली. या वेळी रागाच्या भरात रवींद्र यांनी दाढी करण्याच्या ब्लेडने अमोलच्या गळ्यावर वार करून त्याला जखमी केले. या घटनेत अमोल गंभीर जखमी झाल्याने त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रवींद्र यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.





