अनिकेत नाईकला देवाज्ञा

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील अनिकेत सुनील नाईक याचे गंभीर आजाराने शनिवारी (दि. 27) सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास निधन झाले. निधनसमयी तो 23 वर्षांचा होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिकेत हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनाने नाइर्क कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अनिकेतला गंभीर आजार जडल्याने तो मागील पाच महिन्यांपासून आजारीच होता. त्याच्यावर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर महिनाभरापूर्वीच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तेव्हापासून त्याच्यावर घरीच औषधोपचार सुरू होते. त्यामुळे हळूहळू त्याच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत होती. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शनिवारी मध्यरात्रीपासून त्याची प्रकृती बिघडल्याने पहाटे चारच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आईवडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर चौलमळा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, चौल ग्रा.पं.चे माजी उपसरपंच अजित गुरव, मारुती भगत, चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक, उपाध्यक्ष तथा भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, शैलेश नाईक, चौलमळा ग्रामस्थ, मित्रपरिवार आदींसह पंचक्रोशितील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उपस्थितांनी अनिकेतला श्रद्धांजली अर्पण केली. अनिकेतचे दशक्रिया विधी सोमवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी होणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

Exit mobile version