कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

बाळ माने यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

| रत्नागिरी | प्रतिनिधी |


कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली होती. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने बाळ माने यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, ऐनवेळी बाळ माने यांनीच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील संपूर्ण रंगत संपली असून, अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.


राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाला धक्का बसला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज मागे घेतला. या धक्कादायक निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करत पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
बाळ माने यांच्या या निर्णयामुळे कोकण विधानपरिषद निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. त्यांची तत्काळ पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरून पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

बाळ मानेंचे स्पष्टीकरण
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी छाननी झाली. त्यात सहाच्या सहा उमेदवार वैध ठरले. या निवडणुकीत 1018 मतदार आहेत. महाविकास आघाडी म्हणून आमचे संख्याबळ 200 च्या आसपास आहे. लोकशाहीत निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध निवडणुका होऊ नयेत, या मताचे आपण होतो. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांत मी मतदारांच्या भेटीच्या निमित्ताने काही जणांना भेटण्याचा प्रयत्न केला; परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर ही निवडणूक लढविण्यात काही फायदा होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर उमेदवारी मागे घेतल्याचे बाळ माने म्हणाले.
Exit mobile version