| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल 1 वर्ष, 1 महिना आणि 27 दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या 100 कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्या. चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.
अनिल देशमुख
माजी मंत्री
उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये न्यायालयाने निरिक्षण नोंदवलं आहे. सचिन वझे परमबीर सिंह यांचे निकटवर्ती होते. वझेंवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. असा व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. दोन खूनाच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. सचिन वझेचं तीनवेळा निलंबन झालं आहे. एकदा त्याला 16 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.
जल्लोषात स्वागत
अनिल देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुखांवर फुलांचा वर्षाव केला. अनिल देशमुखांनी जेलबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पेढे भरवले.
आज आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे. आमचे एक सहकारी तुरुंगात होते. आता बाहेर आल्यानंतर कोर्टानं आदेश दिला आहे ते सर्वजण पाहतील. लोकशाही असो की संविधान असो, आरोप झाल्यानंतर कोर्टात दाद मागितली जाते. अनिल देशमुख आज बाहेर आलेले आहेत.
अजित पवार
विरोधी पक्षनेते
पुरावा नसताना दीड वर्ष तुरुंगात ठेवलं होतं. संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो. विनाकारण तुरुंगात ठेवलं जातं. मला देखील अडीच वर्ष तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. संपूर्ण देशानं यावर फेरविचार करावा, असं छगन भुजबळ म्हणाले.