| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सरकारने खासगीकरण आणि भरती प्रक्रियाच बंद केल्याने आक्रमक झालेल्या पशुसंवर्धन विभागातील वर्ग तीन व चारमधील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे ऐन लंपी आजाराच्या साथीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या कामाकाजावर परिणाम झाला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारित येणारे पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात 22 पशुसंवर्धन विभागाची दवाखाने आहेत. या दवाखान्यांमार्फत पशुधनांची निगा राखण्याचे काम केले जाते. पशुधन वाढवण्याबरोबरच पशुधनाबाबत असलेल्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना पशुपालकांपर्यंत पोहचविण्याचे काम वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी करतात. लिपिक, टंकलेखक, वाहन चालक, शिपाई, परिचर, स्वच्छक अशा वेगवेगळ्या पदावर जिल्ह्यात 45 कर्मचारी कार्यरत आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यापासून पशुधनांची निगा राखणे अशी अनेक कामे या कर्मचार्यांद्वारे केली जातात. मात्र ही पदेच रद्द करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप या कर्मचार्यांकडून करण्यात येत आहे.
वर्ग तीन व वर्ग चारची 35 टक्के पदे निरस करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचार्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. भरती करण्यास टाळाटाळ सरकार करीत असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपुर्या मनुष्यबळामुळे पशुधन वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रस्तावित सुधारित आकृतीबंधामधील पदक निरस करण्याचा प्रस्ताव पुर्णपणे रद्द करण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 22 दवाखान्यांसमोर हे आंदोलन सुरु आहे.
महेश फुलारे, अध्यक्ष
पशूसंवर्धन विभाग कर्मचारी संघ शाखा रायगड
