| रायगड | खास प्रतिनिधी |
पंचसूत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात दि. 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा-2024 आयोजित येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद डॉ. शामराव कदम यांनी दिली.
दि. 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनाचा साथ रोग प्रादुर्भावापासून बचाव होण्याकरिता पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात, लम्पीचर्मरोग, घटसर्प, फर्या, पीपीआर, आंत्र विषार इ. रोगांचे लसीकरण तसेच पशुमधील जंत निर्मूलन करण्यासाठी जंतनाशक औषधांचे वाटप, गोचीड गोमाशा निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गायी, म्हशींची वंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पशुधनाच्या सकस आहाराचे महत्त्व तसेच सप्टेंबर 2024 पासून चालू होणार्या 21 व्या पशुगणनेच्या अनुषंगाने माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा.
राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपूर वापर करुन पशुपालनापासून मिळणार्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात सदर पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विभागाकडून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.