दीड लाख जनावरांना लसीकरणाचा आधार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पावसाळ्यात गाय, म्हैस, बैल आदी पाळीवर जनावरांना घटसर्प, फर्या लम्पीसारखे आजार होण्याची भीती आहे. हे आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पाऊल उचलले असून, आतापर्यंत 96 टक्क्यांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यास या विभागाला यश आले आहे. जिल्ह्यातील सुमारे एक लाख 85 हजार 600 जनावरांना लसीचा आधार मिळाला आहे.
रायगड जिल्ह्यात पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहे. परंतु, जिल्ह्यात सतत हवामानात बदल होत आहे. या बदलाचा परिणाम पशुधनाच्या लोकसंंख्येवर होतो. पशुधन घटण्याची भीती अधिक आहे. पावसाळ्यात फर्या, घटसर्प, लम्पीसारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वेगवेगळ्या आजारामुळे ताप, येणे, अंगावर फोड येणे, घसा दुखणे अशा अनेकप प्रकारचा त्रास होतो. कित्येक वेळा दुधाळ जनावरांच्या दुधाचे उत्पादन कमी होणे, गर्भपात होणे, दुर्बलता निर्माण होणे अशा प्रकारची समस्या निर्माण होते. ही समस्या रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग कामाला लागला आहे.
पावसाळ्यात जनावरांवरील आजार रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यात घटसर्प आजारावर 44 हजार लसीचा पुरवठा झाला असून, 42 हजार 765 लसी जनावरांना देण्यात आल्या आहेत. या आजारावरील 98 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. फर्या व घटसर्प या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 18 हजार लसी प्राप्त झाल्या असून, 17 हजार 997 लसी देण्यात आल्या आहेत. या आजारावरील 96 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच लम्पीसाठी एक लाख 41 हजार लसींपैकी एक लाख 24 हजार 838 लसी देण्यात आल्या आहेत. लम्पीचे 90 टक्के लसीकरण झाले आहे.
शेळ्यामेंढ्यांच्या आरोग्याला भीती रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण सुरु झाले आहे. कधी ऊन कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण असा वातावरणात बदल होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेळ्या मेंढ्याच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती अधिक असते. वाढती आर्द्रता व दमटपणामुळे आंत्रविषार हा विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता आहे. अतितीव्र स्वरूपाचा आजार असल्याने बाधित शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू होता. हे रोखण्यासाठी शेळ्या मेंढ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात 24 हजार लसींपैकी 23 हजार 658 शेळ्यांचे लसीकरण झाले आहे. तब्बल 99 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पशु संवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात 12 हजार जनावरांचे लसीकरण अलिबाग तालुक्यात घटसर्प फर्या, आंत्रविषार व लंपी आजारावरील लसीकरणाचे काम तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली आहे. 12 हजार 340 लसींचा पुरवठा अलिबाग तालुक्याला झाला असून, आतापर्यंत 12 हजार 90 लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.