| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत चौक मार्गावरील मस्त मराठी हॉटेलचे मालक जीवन बडेकर व सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या माणुसकीचे दर्शन आज कर्जतमध्ये घडले. त्यांच्या सतर्कतेमुळे एका जखमी मोराला वेळेवर मदत मिळाली आणि त्याचे प्राण वाचवले गेले.
कर्जत तालुका हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथे मोठ्या प्रमाणावर जंगल भाग, अभयारण्ये आणि माथेरानसारखी निसर्गरम्य थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यामुळे या भागात वन्यप्राणी व पक्ष्यांचे, विशेषतः मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. परिसरातील डोंगर भागात जीवन बडेकर यांना झाडीझुडपांमध्ये एक जखमी मोर तडफडताना आढळून आला. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या जखमी अवस्थेची गंभीरता ओळखून त्यांनी तातडीने सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांना बोलावले. दोघांनी मिळून त्या मोराला प्रथम पाणी पाजले व वनविभागाला घटनेची माहिती दिली.
वन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मोराला ताब्यात घेतले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गोडवे, डॉ. सुरेखा वाघमोडे, डॉ. सुर्वणा लता मनगोळी व जयेंद्र कांडे यांच्या मदतीने मोरावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जीवन बडेकर आणि सुनील गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेने एका राष्ट्रीय पक्ष्याचे प्राण वाचवले गेले.
प्राणीमित्राकडून जखमी मोराला जीवदान
