उष्णतेच्या काहिलीने पशु-पक्षी हैराण

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

अवकाळी वादळी पाऊस, बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल, शहरात सिमेंटच्या गगनचुंबी इमारती, जमिनीत पाण्याची पातळी खाली जाणे, असे प्रकार सजीवांच्या मुळावर येऊ लागला आहे. बदलते ॠतुचक्र ही भविष्यात धोक्याची घंटाच आहे, अशी प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ व्यक्त करीत आहेत. उष्णतेच्या काहिलीने पशुपक्षी, प्राणीदेखील हैराण झाले आहेत. मुरूड शहरातील फुलारे स्टेशनरीचे शशिकांत फुलारे यांनी सांगितले की, उष्णतेच्या लाटेने माणसाप्रमाणे पशु-पक्षी, प्राणीदेखील व्याकुळ झाले असून, झाडाखाली किंवा मिळेल तेथे थंडावा शोधत आहेत. श्री. फुलारे यांनी सांगितले की, त्यांना शेतावर पाण्यासाठी तब्बल 300 फुटांपेक्षा अधिक खोलवर बोअरिंग करावे लागले. यावरून समुद्रसपाटीला असूनही पाण्याची पातळी खोलवर गेल्याचे स्पष्ट झाले. एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या लाटेने लाही लाही झाल्याने हैराण झालेल्या नागरिकांना पुढे मे महिना कसा जाणार या चिंतेने घेरले आहे. लग्नसराई, सुट्ट्या, पर्यटन यावर परिणाम होणार असे दिसून येत आहे.

Exit mobile version