| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रामराज मतदारसंघात शेकापचे वर्चस्व पुन्हा एकदा ठसठशीतपणे सिद्ध करत अंजली पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवत त्यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित केले. तब्बल 5 हजार 910 मते मिळवत 562 मतांच्या फरकाने त्यांनी विजय संपादन केला आणि रामराजमध्ये शेकापचा झेंडा पुन्हा फडकवला.
अलिबाग पंचायत समितीच्या रामराज मतदारसंघातून शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अंजली पाटील रिंगणात उतरल्या होत्या. शनिवारी मतदान पार पडले, तर सोमवारी मतमोजणी झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अंजली पाटील आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. चिंचोटी, दिवीपारंगी, बोरघर, मालाडे, महान, सुडकोली या भागांमध्ये त्यांनी 200 ते 473 मतांची आघाडी घेत निर्णायक पकड निर्माण केली. तीन ते चार मतदान केंद्रे वगळता सर्वच केंद्रांवर त्यांनी आघाडी घेतली. त्यामुळे विजयाचा मार्ग सुरुवातीपासूनच सुकर झाला होता. अखेर अंजली पाटील यांना 5 हजार 910 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधकांना 5 हजार 3358 मते मिळाली. साडेपाचशेहून अधिक मतांनी मिळालेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून, अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.







