। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंजली अनिल पाटील यांचे शनिवारी (दि.30) सायंकाळी दीर्घ आजारामुळे निधन झाले. निधनासमयी त्या 64 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या त्या पत्नी होत.
अलिबाग तालुक्यातील सहाण येथील अंजली पाटील यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात अगदी कमी कालावधीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. महिला संघटनवाढीबरोबरच पक्षवाढीसाठी त्या सक्रीय होत्या. त्यांचे पती अनिल पाटील यांची त्यांना कायमच साथ लाभली आहे.
अंजली पाटील यांच्या दीर्घ आजारावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी सायंकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अंजली पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबियात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील सहाण येथील स्मशानभूमीत रविवारी (दि.01) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पाटील कुटुंबियांकडून देण्यात आली.