डॉ. भरत बास्टेवाड यांनी केला सत्कार
| रायगड | खास प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील विद्यार्थिनीने शालेय विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर गगनभरारी घेतली आहे. तिच्या कर्तृत्वाची दखल राज्यभरात घेतली गेली. अंजली भास्कर वाघ असे विद्यार्थिनीचे नाव आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी साममवारी (दि.17) तिचा सत्कार केला आहे.
झुगरेवाडीतील रायगड जिल्हा परिषद शाळेतील आठवीत शिकणारी विद्यार्थिनी अंजली वाघ हिने शालेय विज्ञान प्रदर्शनात ‘रस्ते सुरक्षा’ विषयावर प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाला तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनतर या प्रकल्पाची निवड राज्यस्तरावर करण्यात आली होती. एका दुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केलेल्या प्रकल्पाने राज्यस्तरापर्यंत झेप घेतली. यामुळे डॉ. भरत बास्टेवाड यांनी अंजली वाघ हिचा सत्कार केला. तसेच, यावेळी शाळेतील विद्यार्थी वेदांत म्हात्रे याचा सत्कारही करण्यात आला. वेदांत हा ढोलकी व पखवाजवादक आहे. यावेळी जि.प. प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, मुख्याध्यापक रवी काजळे, शिक्षक सतीश घावत यांच्यासह भास्कर वाघ उपस्थित होते.