अंजू, हर्षिताने आशियाई स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

| बिशकेक (किर्गिस्तान) | वृत्तसंस्था |

अंजू व हर्षिता या भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदकावर नाव कोरले. भारतीय महिला खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये तीन रौप्य व तीन ब्राँझ अशी एकूण सहा पदके पटकावली.

अंजू हिने 53 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीच्या लढतीत तिला उत्तर कोरियाच्या जी किम हिच्याकडून हार पत्करावी लागली. हर्षिताला 72 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चीनच्या कियान जियांग हिच्याकडून 5-2 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. मनीषा भानवाला हिला 62 किलो वजनी गटात, तर अंतिम कुंडू हिला 65 किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळाले. या आधी राधिका हिने 68 किलो वजनी गटात रौप्य व शिवानी पवार हिने ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली होती. पुरुष खेळाडूंनी फ्रीस्टाईल प्रकारात तीन पदके पटकावली. उदितने 57 किलो वजनी गटात रौप्य व अभिमन्यूने 70 किलो वजनी गटात, तसेच विकीने 97 किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली. ग्रीको रोमन प्रकाराच्या लढती सोमवारपासून सुरू होणार आहेत.

Exit mobile version