कलाकारांच्या सुमधुर सुरांनी संकुल दणाणलं
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील गोरगरीबांची मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत, शिक्षण घेताना आर्थिकदृष्ट्या अडचणी येवू नयेत याकरिता खेडोपाड्यात आ. जयंत पाटील यांनी रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांनी पाहिलेले स्वप्न अस्तित्वात उतरवले. पीएनपी एज्युकेशन सोसायटी विनाअनुदानीत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था उभारली. बघताबघता एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. पीएनपी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास 19 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने महाविद्यालयाचा वर्धापनदिन पीएनपी संकुलात जल्लोषात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याकरिता जिल्ह्यातील नामवंत गायक योगेश काळबेरे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यांच्या समवेत “आई तुझे देऊळ’ फेम गायक योगेश आग्रावकर”, “सुंदरा मनामध्ये भरली” आणि “जय जय स्वामी समर्थ” या मालिकांमध्ये भूमिका साकारणारे चंद्रकांत मोरे, गायिका भूमी काळबेरे, गायक हर्षल पाटील, अक्षय म्हात्रे, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्रा. नम्रता पाटील, बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश मोरे, प्रा. विक्रांत वार्डे, प्रा. रसिका म्हात्रे, प्रा. रविंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी गायक योगेश काळबेरे यांनी मनोगत व्यक्त करताना संगितले की, महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून आज पर्यंत महाविद्यालयाचा शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक दृष्ट्या आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला पाहत असताना आनंद वाटत आहे. अल्पावधीतच महाविद्यालय हे जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणारे एक महत्वाचे महाविद्यालय झालेले आहे. सर्व क्षेत्रात अटकेपार झेंडा महाविद्यालयाने रोवला आहे. युथ फेस्टिवलमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात आणि विजेते होतातचं हे एक समिकरण झालेले आहे.
कार्यक्रम प्रसंगी कलाकार, महाविद्यालयातील प्रथम वर्षातील नवीन विद्यार्थी आणि कर्मचारी वृंदाने तरुणाईची मनपसंद गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .तसेच सध्या संपूर्ण देशभर अमृत महोत्सव असल्याने महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायनाच्या मैफिलीने विद्यार्थी व शिक्षक वृंद प्रेरित झाले. यामुळे स्वागत समारंभ अविस्मरणीय झाला. संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, योगेश आग्रावकर, प्रा. विक्रांत वार्डे यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या जडणघडणीत योगदान देणार्या प्रा. विक्रांत वार्डे, शिक्षकेतर कर्मचारी सुबोध पाटील, सुनील राऊत, नितेश पडियार, प्रितेश पाटील, अपर्णा शेळके, निलेश डबरे, जितेंद्र थळे आणि इतर कर्मचार्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केतकी पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रा. मिलिंद घाडगे यांनी केले.