सावित्रीबाई फुलेंची जयंती सर्वत्र साजरी

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन
स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, महिलांना स्वावलंबनाचा महामंत्र देणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कर्जत नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर, नगरसेवक बळवंत घुमरे, आदींसह नगरपरिषद प्रशासकिय अधिकारी उमेश राऊत, कनिष्ठ अभियंता सारिका कुंभार, रविंद्र लाड, अरविंद नातू, कल्याणी लोखंडे, ॠषिता शिंदे, अविनाश पवार, हृदयनाथ गायकवाड, बापू बहिरम, शेखर लोहकरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

रोहा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रोहा रायगड यांच्या वतीने रोहा येथे सावित्रीबाई जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जात होते, त्या काळात महारष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री-शिक्षण व दलित्धारक कार्य करणार्‍या सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील स्रियांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य केले. याबरोबर केशवपन, विधवा विवाह बंदी, देवदासी, मुरळी, दारुडेपणा अशा चालींचे उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करणारी, इंग्रजी शिक्षण, आधुनिक शिक्षण घ्या, जगातील प्रगती जाणा आणि मनुवादी व्यवस्थेला ठोकर मारा असे गर्जून सांगणारी थोर विचारवंत समजून सांगणारी सावित्रीबाई फुले ही एक थोर समाज सुधारक होत्या. अशा थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी 1995 पासून सर्वत्र साजरी केली जाते. यावेळी रायगड जिल्हा महिला अध्यक्ष प्रियांका कांबळे, उपजिल्हा अध्यक्ष शिवाजी मूटके, सचिव राजेंद्र जाधव, खजिनदार दगडू बामुगडे, एल.जाधव राजेंद्र शिंदे शेळके महाराज इतर सदस्य उपस्थित होते.

पनवेलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल जवळील वडघर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जावून तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या साथीने क्रांतीज्योती व स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही प्रसंग उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. त्यामध्ये प्रामुख्याने सावित्रीबाई फुले यांनी पुण्याला पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यावेळी त्या काळच्या सनातनांनी त्यांना खुप त्रास दिला. याप्रसंगाची आठवण त्यांनी करून दिली व उपस्थित विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या शिका, शिक्षित व्हा स्वतःचा विकास करा, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे जयदास घरत उपस्थित होते.

प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीच्या निमित्ताने तसेच जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवखोल तालुका श्रीवर्धन येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांची वेशभूषा केल्याने कार्यक्रमाला अधिकच शोभा आली. यावेळी मुख्याध्यापिका क्रांती भोसले, गांगोडे सर आणि विद्यार्थी उपस्थित होते. जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत दिनांक 3 ते 12 जानेवारी कालावधीत शाळेत वेशभूषा, निबंध, यशस्वी महिलांच्या मुलाखती व सन्मान, समूह गायन, चित्रकला, भाषणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती भोसले यांनी सांगितले.

Exit mobile version