श्री.संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डाचे संचालक मंडळ घोषित करा

कुंभार समाजाची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्री. संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्ड चे संचालक मंडळ घोषित करून कामकाज त्वरित सुरु करुन कुंभार समाजाच्या प्रलंबित मागण्या पुर्ण कराव्यात यासाठी कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. कुंभार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनंत महाडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा समावेश होता.

आपल्या निवेदनात कुंभार समाज सामाजिक संस्थेने म्हटले आहे की, मागील अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासुन कुंभार समाजाच्या एकाही प्रलंबित मागणीबाबत या सरकारनी सकारात्मक निर्णय केलेला नाहीच किंबहुना कुंभार समाजाच्या मागण्यांबाबत समाज संघटनेच्या पदाधिकार्‍यांसोबत अधिकृतरित्या एकही मीटिंग शासन स्तरावर झालेली नाही. कुंभार समाजाच्या हजारों कार्यकर्त्यांच्या संघर्षातून युती सरकारनी कुंभार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायीक विकासाच्या दृष्टीने श्री संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्ड ची घोषणा करून रुपये 10 कोटी निधिची तरतूद सुद्धा केली. दिनांक 8 मार्च 2019 अन्वये मातीकला बोर्ड स्थापनेचा शासन निर्णय श्रीयुती सरकार असतानाच निर्गमित झालेला आहे. परंतु या महाविकास आघाडी सरकारनी या संदर्भात एक मीटिंग सुद्धा बोलाविली नाही. आणि बजेटमध्ये मातीकला बोर्डाला एक रूपयांचे अनुदानसुद्धा जाहिर केलेले नाही.

शासन स्तरावर युती सरकारनी निर्माण केलेले मातीकला बोर्ड पूर्णपणे रद्द करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकार व त्यामधील संबंधित खात्यांचे मंत्री महोदय करीत आहे. यावरून हे स्पष्ट आहे की राज्यातील आपल्या नेतृत्वात असलेली महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे कुंभार समाजाच्या न्याय्य मागण्यांच्या विरोधात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सकल कुंभार समाजाच्या वतीने आपल्या सरकारच्या कुंभार समाजविरोधी धोरणांच्या निषेधार्थ निदर्शने करून सदर निवेदनामार्फत मागणी करतो की येत्या 2 महिन्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डाच्या अध्यक्षांसह संचालकांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात यावी, मातीकला बोर्ड ला रुपये 50 कोटीचा निधी देण्यात यावा व मातीकला बोर्ड चे कामकाज नियमित स्वरूपात सुरु करण्यात यावे, जेणेकरून सदर बोर्ड च्या माध्यमातून राज्यातील कुंभार समाजाचा आर्थिक व व्यावसायिक विकास होईल. या सोबतच कुंभार समाजाच्या खालील प्रलंबित मागण्यां बाबत आपल्या प्रमुख उपस्थित एक मीटिंग बोलावून समाजाला न्याय देण्याकरिता पुढाकार घ्यावा. अन्यथा राज्यातील कुंभार समाज आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आाल आहे.

या शिष्टमंडळात अनंत महाडकर यांच्यासह सचिव दिलीप साळवी, सल्लागार सदस्य गजानन चौलकर, रामदास साळवी, नंदकुमार चिरनेरकर, अलिबाग महिला आघाडी अध्यक्षा वैजयंती उकरुळकर, सदस्य रसिका चौलकर, भारती चौलकर, संध्या पालवणकर, सविता पालवणकर तसेच गीता नागावकर आदींचा सहभाग होता

Exit mobile version